T20 World Cup 2024 : २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी अद्याप पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली नाही. पण बाबर आझमच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ असेल हे निश्चित आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान मायदेशात इंग्लंडविरूद्ध चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. अलीकडेच पार पडलेल्या ट्वेंटी-२० मालिकेत पाकिस्तानने आयर्लंडविरूद्ध २-१ असा विजय मिळवला. आगामी विश्वचषकासाठी बहुतांश संघांच्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत. मात्र, पाकिस्तानने अद्याप आपला संघ जाहीर केला नाही.
दोन जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. आगामी स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात आहे. अशातच विविध देशातील माजी खेळाडू भविष्यवाणी करत असून कोण प्रभावी ठरेल याबाबत भाष्य करत आहे. अशातच पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकने आपल्या संघातील शिलेदारांना काही सल्ले दिले आहेत.
शोएब मलिक म्हणाला की, सैय अयुबने जोखीम घेऊन मोठे फटके मारायला हवेत. अशा प्रकारच्या फलंदाजांना सातत्याने अशी कामगिरी करायची संधी फार कमी मिळते. जर प्रतिस्पर्धी संघाने मोठी धावसंख्या उभारली असेल तर सैय अयुबने सलामीवीर म्हणूनच खेळायला हवे. पण, १६०-१७० अशी धावसंख्या असेल तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करायला हवी. पाकिस्तानी संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आगामी काळात होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत इंग्लंडचा पराभव केल्यास ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी संघाचा आत्मविश्वास वाढेल. शोएब मलिक पाकिस्तानातील माध्यमांशी बोलत होता.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ