नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा सीनियर खेळाडू शोएब मलिकनेपाकिस्तानी संघाबाबत मोठा खुलासा केला आहे. आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत पाकिस्तानला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा पराभव होताच शोएब मलिकने पाकिस्तानच्या संघ निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मलिकने केलेल्या दाव्यानंतर माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. आशिया चषकातील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव करून श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकाचा किताब पटकावला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीलाच श्रीलंकेला मोठे झटके दिले. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले होते.
शोएब मलिकने साधला निशाणा दरम्यान, पाकिस्तानचा संघ 20 षटकात केवळ 147 धावा करू शकला. शोएब मलिकने ट्विटच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. "मैत्री, आवड-नापसंत या संस्कृतीतून आपण कधी बाहेर पडू? अल्लाह नेहमी प्रामाणिक लोकांना मदत करतो." अशा शब्दांत मलिकने पाकिस्तान संघ निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच कामरान अकमलने मलिकला प्रत्युत्तर देताना जास्त ईमानदार न होण्याचा सल्ला दिला आहे. मोहम्मद हफीज, वसीम अक्रम यांसारख्या पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी शोएब मलिकचा मधल्या फळीत समावेश करावा, असे म्हटले होते. शोएब मलिकला आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक 2022 साठी पाकिस्तान क्रिकेट संघात स्थान मिळालेले नाही.
पाकिस्तानच्या सध्याच्या संघात शोएब मलिकला स्थान मिळाले नाही. म्हणूनच मलिकने टीका केली असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. पाकिस्तानातील अनेक दिग्गज खेळाडूंनी मलिकला संधी द्यायला हवी असे म्हटले होते. पाकिस्तानी संघात मक्तेदारी सुरू असल्याचा आरोप मलिकने केला असून संघात आवड-नापसंत ही संस्कृती जोपासली जाते असा आरोप त्याने केला आहे.
अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निराशाजनक सुरूवात केली. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. मात्र राजपक्षा शानदार फलंदाजी करत होता. राजपक्षाने सातव्या बळीसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 147 धावा करू शकला.