हॅमिल्टन : पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकसोबत आज क्रिकेटच्या मैदानावर मोठा अपघात झाला. न्यूझीलंडविरोधात हॅमिल्टन येथे चौथ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ही घटना घडली आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना 32 व्या षटकात ही घटना घडली. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत असल्यामुळे मलिक हेल्मेट न घालता मैदानात उतरला होता. या षटकात एक चोरटी धाव घेण्यासाठी मलिक धावला पण त्याचा साथीदार मोहम्मद हफीजने त्याला परत पाठवलं. पण पॉइंटच्या दिशेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या कॉलीन मुन्रोने मलिकला बाद करण्यासाठी केलेला थ्रो थेट जाऊन मलिकच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आदळला आणि यष्टीरक्षकाच्या मागे जाऊन मलिक कोसळळा. तर तो चेंडू थेट सीमारेषेपार गेला. सर्वच खेळाडू आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका त्यावेळी चुकला. खेळाडू आणि डॉक्टरांनी मलिकच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर थोड्यावेळातच मलिक उभा राहिला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
ही घटना घेडली त्यावेळी मलिक एक धावेवर खेळत होता, त्यानंतर मलिकने पुन्हा फलंदाजी सुरू केली पण केवळ तीन चेंडूंनंतर तो 6 धावा काढून बाद झाला. त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी मलिक मैदानात उतरला नाही. चेंडू लागल्यामुळे काही वेळासाठी मलिकची शुद्ध हरपली होती. तो खेळू शकत नव्हता म्हणून क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट टिमचे फिजियोथेरपिस्ट व्ही. बी. सिंह यांनी दिली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या उर्वरीत मालिकेतून मलिक बाहेर झाला आहे.
पाहा व्हिडीओ -