T20 World Cup 2024 मधून पाकिस्तानचा संघ बाहेर झाला आहे. साखळी फेरीत अमेरिका आणि भारताकडून झालेल्या पराभवामुळे शेजाऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला. पाकिस्तानी संघ स्पर्धेबाहेर होताच चाहत्यांसह माजी खेळाडू बाबर आझमच्या संघावर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकने एक मोठे विधान केले. पुन्हा एकदा पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्याने सांगितले.
पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना शोएब मलिकने सांगितले की, मला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. मी आगामी काळात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध आहे. मी माझ्या देशासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मला पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. शेजारील देशात होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का हे पाहण्याजोगे असेल. पण, जाणकारांच्या म्हणण्यानुसार यावेळी देखील भारतीय संघाचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मोठ्या कालावधीपासून राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. मात्र, अद्याप त्याने निवृत्तीची घोषणा केली नाही. त्याने २०२१ मध्ये बांगलादेशविरूद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभावित वेळापत्रक आयसीसीकडे सोपवले असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल असे सुचवले आहे. 'क्रिकबज'ने दिलेल्या वृत्तानुसार, पीसीबीने आयसीसीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे संभाव्य वेळापत्रक सोपवले आहे. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान हा सामना लाहोर येथे होईल. ही लढत साखळी फेरीतील १५ सामन्यांमध्ये सर्वात शेवटी असेल. मात्र, अद्याप सामन्याची तारीख समोर आली नाही. तसेच कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होतील असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.