नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबर रोजी आमनेसामने असणार आहेत. खरं तर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची टी-20 विश्वचषकासाठी संघात निवड झालेली नाही. तसेच आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब मलिकने एक ट्विट केले होते की, संघात मैत्री आणि मैत्रीच्या आधारावरच खेळाडूंची निवड केली जात आहे. आता पहिल्यांदाच त्याने यावर उघडपणे भाष्य केले आहे. आपण संघातील कोणाच्याही विरोधात नसल्याचे त्याने म्हटले आहे.
शोएब मलिकला आशिया चषकात पाकिस्तानच्या संघात स्थान मिळाले नव्हते. त्याने मागील वर्षीच्या टी-20 विश्वचषकात साजेशी खेळी केली होती. त्यामुळेच पाकिस्तान संघाची खराब मिडिल ऑर्डर पाहता अनेक चाहत्यांनी मलिकला संघात परत आणण्याची मागणी केली होती. त्याचवेळी आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा संघ श्रीलंकेकडून पराभूत झाला तेव्हा मलिकने संघ निवडीबाबत सूचक ट्विट करून पीसीबीवर निशाणा साधला होता. तसेच मी बाबर आझमवर नाराज नसल्याचे मलिकने स्पष्ट केले.
मी कोणाच्याही विरोधात नाही - मलिकशोएब मलिकने पाकिस्तानच्या संघ निवड समितीवर नाराजी व्यक्त केली आहे. मलिकने समा टीव्हीशी बोलताना म्हटले, "हे पाहा, जिथे संधी मिळेल तिथे जाऊन क्रिकेट खेळणे हेच माझे काम आहे. निवड करणे किंवा न करणे हे संघ व्यवस्थापन, निवड समिती किंवा पीसीबीच्या हातात आहे. मी फक्त पाहतो की मला जिथे संधी मिळते तिथे मी उपलब्ध कसा होईन आणि तिथे चांगली कामगिरी करतो. मला कोणाशीही काही अडचण नाही. मी कोणाच्याही विरोधात नाही कारण मी नेहमी सकारात्मक विचार करतो आणि त्यामुळेच मी माझ्या करिअरमध्ये खूप यशस्वी झालो आहे."
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, फखर झमान, शाहनवाज दहानी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"