Shoaib Malik, Pakistan Cricket: पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. वर्षभरापूर्वी त्याने एका अभिनेत्री सोबत केलेले फोटोशूट हा वादाचा विषय ठरला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा ( Sania Mirza ) हिच्याशी घटस्फोट घेत त्याने तिसरे लग्न केले. या विषयामुळे त्याच्या नावाची बरीच चर्चा झाली. आता पाकिस्तान क्रिकेट संघाशी संबंधित एका मुद्द्यावरून शोएब मलिकच्या नावाची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानचा महान अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या सर्व आशा सोडल्या आहेत, असे ताज्या चर्चेवरून स्पष्ट होते.
शोएब मलिकने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले की, त्याला पुन्हा कधीही पाकिस्तानी संघाकडून खेळायचे नाही, आता त्याची कोणतीही इच्छा नाही. मात्र, शोएब मलिकने आपण अद्याप निवृत्तीची घोषणा करणार नसल्याचेही सांगितले. शोएब मलिक २०२१मध्ये पाकिस्तानकडून शेवटचा टी२० सामना खेळला. त्याला तीन वर्षांपासून पाकिस्तानी संघात संधी मिळालेली नाही. मलिकने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतली, पण टी२० क्रिकेटमधून त्याने अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नाही.
काय म्हणाला शोएब मलिक?
"मी खूप आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी बरीच वर्षे पाकिस्तानसाठी खेळलो आणि आता मला पाकिस्तान संघाकडून खेळण्यात रस नाही. मी आधीच दोन फॉरमॅट सोडले आहेत आणि अजून एक फॉरमॅट बाकी आहे. मी परदेशी लीगमध्ये खेळत राहतो आणि संधी मिळेल तेव्हा खेळाचा आनंद घेतो. पण आता पाकिस्तानच्या संघाकडून खेळण्यात मला अजिबात रस नाही," असे शोएब मलिक मुलाखतीत म्हणाला.