पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकनं ( Shoaib Malik) शनिवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत जगातील केवळ तीनच फलंदाजांना असा विक्रम करता आला आहे. टीम इंडियाचे स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही ही कामगिरी जमलेली नाही. UAEत इंडियन प्रमीअर लीग सुरू असली तरी पाकिस्तानात सुरू असलेल्या नॅशनल ट्वेंटी-20 कपची जोरदार चर्चा आहे. शुक्रवारी या स्पर्धेत खुशदीप शाह यानं 35 चेंडूंत शतक झळकावण्याचा विक्रम केला अन् आज शोएब मलिकनं विश्वविक्रमाला गवसणी घातली. या विक्रमानंतर शोएब मलिकची पत्नी अन् भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हीनं कौतुकाचं ट्विट केलं.
खिबर पख्तूनख्वा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मलिकनं शनिवारी 44 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 74 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर संघानं 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारली. या खेळीनं मलिकला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जगातील तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनवले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा तो जगातील तिसरा फलंदाज, तर आशियातील पहिलाच फलंदाज ठरला.
या सामन्यापूर्वी मलिकच्या नावावर 9953 धावा होत्या आणि आज त्यानं 74 धावा करून 10 हजार धावांचा पल्ला पार केला. आतापर्यंत केवळ ख्रिस गेल ( 13296 ) आणि किरॉन पोलार्ड ( 10370) यांनाच हा पराक्रम करता आला आहे. मलिकनं 395 सामन्यांत ही कामगिरी करून दाखवली. त्याच्या नावावर ट्वेंटी-20त 62 अर्धशतकं आहेत. नाबाद 95 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. भारताचा विराट कोहली ( 9033) आणि रोहित शर्मा ( 8853) या विक्रमात अनुक्रमे 7 व 8 व्या क्रमांकावर आहेत.
सानियानं ट्विट केलं की,''संयम, अथक परिश्रम, त्याग आणि विश्वास म्हणजे शोएब मलिक.. तुझा अभिमान.''