Champions Trophy 2025 : पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक नेहमी चर्चेत असतो. क्रिकेट विश्वातील घडामोडींवर वारंवार भाष्य करणारा मलिक आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यामुळे चर्चेत आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. पण, बीसीसीआय आपला संघ तिकडे पाठवणार नसल्याचे जवळपास निश्चित आहे. याआधी देखील भारताने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दर्शवला आहे. याचाच दाखला देत मलिकने म्हटले की, भारताने खेळाला राजकारणापासून दूर ठेवायला हवे. दोन्हीही क्रिकेट बोर्ड तयार असतील तर द्विपक्षीय मालिकाही खेळवायला हरकत नाही.
शोएब पुढे म्हणाला की, खेळ आणि राजकारण या वेगवेगळ्या बाजू आहेत. खेळात राजकारण येता कामा नये. मागील वर्षी पाकिस्तानी संघ भारतात गेला होता आणि आता टीम इंडियाला पाकिस्तानात खेळण्याची चांगली संधी आहे. भारतीय संघातील बहुतांश खेळाडू पाकिस्तानात येण्यास इच्छुक आहेत. आम्ही खूप चांगली लोक आहोत. भारतातून आलेल्या प्रत्येकाची इथे चांगली सोय केली जाईल. त्यामुळे मला वाटते की, नक्कीच भारतीय संघ पाकिस्तानात येईल. मलिक 'क्रिकेट पाकिस्तान'शी बोलत होता.
दरम्यान, पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होत असल्याचे दिसते. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा थरार रंगणार आहे. पण, बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे कळते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. खरे तर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव नेहमीच पाकिस्तानात जाणे टाळले आहे. शेवटच्या वेळी या दोन्ही देशांमध्ये २०१२-१३ मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हापासून केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडतात. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता.