shoaib akhtar on team india : लखनौ येथे रविवारी झालेल्या सामन्यात भारताने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून विजयाचा षटकार लगावला. भारताने चालू विश्वचषकातील आतापर्यंतचे सर्व सहा सामने जिंकून दबदबा निर्माण केला आहे. भारताच्या सांघिक खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील रोहितसेनेच्या कामगिरीला दाद दिली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर बोलताना अख्तरने इंग्लिश संघाला एक भन्नाट सल्ला दिला. वन डे क्रिकेटमध्ये ट्वेंटी-२० प्रमाणे खेळ केला तर अशीच अवस्था होईल, असा टोमणा त्याने इंग्लंडला लगावला.
शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारताविरूद्धच्या पराभवानंतर इंग्लंडचे वन डे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. काल झालेल्या लढतीत इंग्लिश गोलंदाजांनी चमक दाखवली पण सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज नतमस्तक झाले. भारताने चालू विश्वचषकात पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली आणि ९ गडी गमावून २२९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघ केवळ १२९ धावांत आटोपला.
भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना अख्तरने म्हटले, "भारताची फलंदाजी आधीपासूनच अप्रतिम आहे, जी आजतागायत तशीच आहे. या आधी भारताच्या फलंदाजीला सर्वजण घाबरत होते. पण, आता स्थिती अशी आहे की त्यांच्या घातक गोलंदाजीला देखील घाबरून राहायला हवं." खरं तर शमीने बेन स्टोक्सचा उडवलेला त्रिफळा डोळ्यात साठवून ठेवावा असा क्षण होता. विश्वविजेत्या संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूला चीतपट करून शमीने चाहत्यांची मनं जिंकली.
मोहम्मद शमी (४) आणि जसप्रीत बुमराह (३) यांनी घातक गोलंदाजी करून भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा जल्लोषाची संधी दिली. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज लिव्हिंगस्टोन होता. २७ धावा करण्यात तो यशस्वी ठरला. इतर फलंदाज फ्लॉप झाले आणि संपूर्ण संघ १२९ धावांवर बाद झाला. टीम इंडियासाठी शमीने सर्वाधिक चार बळी घेतले. तर बुमराहने तीन बळी घेऊन इंग्लंडचा करेक्ट कार्यक्रम केला.