नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या क्रिकेट समितीचे सदस्य व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने आज एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बीसीसीआयला अनिल कुंबळे हेच कोच म्हणून हवे होते. पण तरीही त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. या साऱ्या गोष्टींची उकल लक्ष्मण यांनी केली आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत बऱ्याच अनाकलनीय गोष्टी घडल्या आणि त्याचा परीपाक भारताच्या पराभवात झाला. या पराभवानंतर भारताचे प्रशिक्षक कुंबळे यांना आपले पद सोडावे लागले होते. पण या घटना जेव्हा घडत होत्या, तेव्हा बीसीसीआयच्या क्रिकेट समितीला कुंबळे हेच कोच म्हणून हवे होते. या समितीमध्ये लक्ष्मणसहीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचाही समावेश होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला होती. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जे संघ व्यवस्थापनेच्या बैठकीमध्ये ठरले होते, त्याच्या उलट केले होते. त्यामुळे कोहलीला कुंबळे हे प्रशिक्षकपदी नकोसे होते आणि त्याला या पदावर रवी शास्त्री यांना आणायचे होते, अशी चर्चा रंगली होती.
या साऱ्या प्रकाराबाबत लक्ष्मण म्हणाला की, " या साऱ्या प्रकरणाचा चुकीचा अर्थ घेतला गेला. कारण आमच्या समितीला कुंबळे हेच प्रशिक्षक म्हणून हवे होते. दुसरीकडे कोहलीनेदेखील त्यांना पदावरून काढण्यासाठी कोणता दबाव आणला नव्हता. पण कुंबळे यांनाच हे पद नको होते. त्यामुळे त्यांनी भारताचे प्रशिक्षकपद सोडले. "