Join us

धक्कादायक! क्रिकेट स्पॉट फिक्सिंगप्रकरणी एका प्रशिक्षकाला अटक

आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेले एस. श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडेला या तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 18:39 IST

Open in App

मुंबई : भारतातील स्पॉट फिक्सिंगची कीड अजूनही संपलेली नाही. कारण भारतातील क्रिकेटच्या विविध लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्येही मोठे स्पॉट फिक्सिंग झाल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.

आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेले एस. श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडेला या तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. पुरेशा पुराव्यांअभावी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्या तिघांना दोषमुक्त केले होते. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सध्याच्या घडीला कर्नाटक प्रीमिअर लीगमधले स्पॉट फिक्सिंगप्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात भारताचा एक गोलंदाजाही सापडला आहे. त्याचबरोबर बेलगावी पँथर्स या संघाचे प्रशिक्षक सुधेंद्र शिंदे यांना आज अटक करण्यात आली आहे. शिंदे यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आले आहे.

कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या फिक्सिंगच्या कचाट्यात आता भारतीय संघाचा गोलंदाज सापडला आहे. कर्नाटक प्रीमिअर लीगमधील फिक्सिंग प्रकरणात आतापर्यंत काही खेळाडूंवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यात आता भारताचा गोलंदाज अडकल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे. केंद्रीय गुन्हे विभागानं भारतीय गोलंदाजाला या प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेला तो पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

भारताचा माजी गोलंदाज अभिमन्यू मिथून असे या गोलंदाजाचे नाव आहे. कर्नाटक प्रीमिअर लीगमधील शिवामोग्गा लायन्स संघाचा तो कर्णधार आहे. त्याला चौकशीसाठी बोलावल्याच्या वृत्ताला सहपोलीस आयुक्त ( गुन्हे) संदीप पाटील यांनी दुजोरा दिला. ''मिथून याला गुन्हे विभागासमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. कर्नाटक प्रीमिअर लीगच्या नुकत्याच पार पडलेल्या हंगामात झालेल्या फिक्सिंग प्रकरणाबाबत त्याला विचारणा करण्यात येणार आहे,'' असं पाटील यांनी सांगितले. 

या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बेळगावी पँथर्स संघाचे मालक अली अस्फाक थारा याचाही समावेश आहे. तसेच केंद्रीय गुन्हे विभागानं या प्रकरणासंदर्भात कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला नोटीसही पाठवली आहे.  2008पासून ही लीग खेळवण्यात येत आहे. यातील बरेच खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमध्येही चमकदार कामगिरी करत आले आहेत.   

टॅग्स :मॅच फिक्सिंगआयपीएलराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स