बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू मोहम्मद सोझीब यानं १४ नोव्हेंबरला राहत्या घरी आत्महत्या केली. राजशाही येथील २१ वर्षीय खेळाडू १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेश संघाचा सदस्य होता. स्टँडबाय खेळाडू म्हणून तो संघासोबत न्यूझीलंडमध्ये गेला होता, परंतु त्याला अंतिम ११मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तत्पूर्वी राईट-हँडेड फलंदाजानं आशिया चषक स्पर्धेतही बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केलं.
२०१८मध्ये त्यानं शिनेपूकूर संघाकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्याला ९, ० व १* अशा धावा करता आल्या. मार्च २०१८पासून तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेलाच नाही. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे गेम डेव्हलपमेंट मॅनेजर अबू इनाम मोहम्म्द यांनी या घटनेचं दुःख व्यक्त केलं. आगामी बांगबंधू ट्वेंटी-२० चषक स्पर्धेसाठीच्या ड्राफ्टमध्ये त्याचा समावेशही नव्हता. त्यामुळे कदाचित तो नैराश्यात गेला असावा आणि हे पाऊल उचललं असाव, असे अबू यांनी सांगितले.
''सोजीब हा २०१८च्या १९ वर्षांखालील बांगलादेश संघाचा सदस्य होता. आशिया चषक स्पर्धेत तो श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळला होता. त्याच्या जाण्यानं नक्कीच दुःख झालंय. निराश असल्यामुळे किंवा अन्य कोणत्या कारणानं त्यानं हे पाऊल उचललं हे सांगणं अवघड आहे,''असेही अबू यांनी सांगितले.