क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. त्यामुळे या खेळात मैदानात आणि मैदानाबाहेर कधी काय घडेल हे सांगता येत नाही. त्यात खेळाडू कितीही लहान असला किंवा कितीही महान असला तरी एकवेळ अशी येते की त्याला या खेळाला राम राम ठोकावाच लागलो. मात्र सर्वसाधारणपणे ३५ ते ४० वर्षे हे क्रिकेटमधून निवृत्तीचं वय समजलं जातं. पण एका क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी खेळाला राम राम ठोकल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्की याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
निवृत्तीच्या निर्णयाबाबत विल पुकोवस्की याने सांगितले की, ‘’मी पुन्हा क्रिकेट खेळणार नाही. मागचं एक वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक राहिलं आहे. स्पष्टच सांगायचं तर आता मी कुठल्याच प्रकारचं क्रिकेट खेळणार नाही’’. विल पुकोवस्की हा वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्रस्त असून, त्याने मार्च २०२४ मध्ये आपला शेवटचा शेफिल्ड शिल्ड सामना खेळला होता. त्या सामन्यात टस्मानियाचा वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथ याने टाकलेला चेंडू पुकोवस्की याच्या हेल्मेटवर लागला होता. दरम्यान, विल पुकोवस्की याने त्याचा एकमेव कसोटी सामना २०२१ च्या जानेवारी महिन्यात भारताविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने ६२ धावांची खेळी केली होती.
विल पुकोवस्की याने पुढे सांगितले की, मला पुढची १५ वर्षे क्रिकेट खेळायचं होतं. मात्र माझ्याकडून ही संधी हिरावली गेली, याचं मला वाईट वाटतं. मात्र आता माझ्या डोक्याला दुखापत होणार नाही. पण त्या दुखापतीची लक्षणं अजूनही जाणवतात. ही दुखापत होण्यापूर्वी परिस्थिती कशी होती आणि आता कशी आहे, याची मला जाणीव आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने माझ्यामधील हा फरक अनुभवला आहे.
दुखापतीनंतरच्या परिणामांबाबत विल पुकोवस्की याने सांगितले की, मी घरकामात मदत करत नसल्याने, खूप झोपून राहत असल्याने माझी होणारी पत्नी नाराज होती. दुखापत झाल्यापासूनचं एक वर्ष माझ्यासाठी खूप आव्हानात्मक राहिलं आहे. बरीचशी लक्षणं दूर झाली नाहीत, त्यामुळे मला निवृत्तीचा हा कटू निर्णय घ्यावा लागला, असेही पुकोवस्की याने सांगितले.