लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानपाठोपाठ आणखी एका आशियाई संघ श्रीलंकेने यजमानांना पराभवाची चव चाखवली. लसिथ मलिंगाने अनुभव पणाला लावताना इंग्लंडच्या अव्वल फलदाजांना माघारी पाठवल्यानंतर धनंजया डी'सिल्वाने शेपूट गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडला 233 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. श्रीलंकेने त्यांचा डाव 212 धावांत गुंडाळला आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. बेन स्टोक्सची 82 धावांची एकाकी झुंज व्यर्थ ठरली.
श्रीलंकेने अँजेलो मॅथ्यूजची एकाकी झुंजीच्या जोरावर यजमान इंग्लंडसमोर 233 धावांचे लक्ष्य ठेवले. मार्क वूड व जोफ्रा आर्चर यांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेला निर्धारीत 50 षटकांत 9 बाद 232 धावा केल्या. मॅथ्यूज 114 चेंडूंत 85 धावांवर नाबाद राहिला. अविष्का फर्नांडो ( 49) आणि कुशल मेंडीस ( 46) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला पुन्हा ट्रॅकवर आणले. त्यानंतर मेंडीस आणि अँजेलो मॅथ्यू यांनी 71 धावांची भागीदारी करताना संघाला पुन्हा सुस्थितीत आणले. धनंजया डी'सिल्वानेही 29 धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडलाही फार चांगली कामगिरी करता आली नाही. लसिथ मलिंगाने पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टोला बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्यापाठोपाठ जेम्स व्हिन्सीलाही त्यानं माघारी पाठवून 2 बाद 26 अशी इंग्लंडची अवस्था केली. जो रूट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशविरुद्ध वादळी खेळी करणाऱ्या मॉर्गनचा अडथळा उदानाने दूर केला. त्यानं स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल पकडला. हळुहळू सामना इंग्लंडच्या हातून निसटताना दिसला. मलिंगाने आपला अनुभव पणाला लावताना इंग्लंडच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. त्यानं वर्ल्ड कप स्पर्धेतील 50 विकेट्सचा पल्लाही ओलांडला. जो रुट 89 चेंडूंत 57 धावा करून माघारी परतला. बेन स्टोक्स आणि मोईन अली ही जोडी इंग्लंडला सावरेल असे वाटत होते. पण, अलीनं घाई केली अन् माघारी परतला. धनंजयाच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. उदानाने सीमीरेषेनजीक त्याचा सुरेख झेल टिपला. दरम्यान, बेन स्टोक्सने अर्धशतकी खेळी करून इंग्लंडच्या विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. पण, त्याच्या साथीला इंग्लंडचे अन्य फलंदाज टिकून खेळू शकले नाही. ख्रिस वोक्सला ( 2) धनंजयाने बाद केले. धनंजयाने त्याच षटकात आदिल रशीदलाही बाद करून इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. जोफ्रा आर्चरही काहीच कमाल करू शकला नाही. मलिंगाने 43 धावांत चार विकेट्स घेतल्या.