Bangladesh Premier League, Andre Fletcher: बांगलादेश प्रीमियर लीग २०२२ या स्पर्धेत एक दुःखद घटना घडली. सोमवारी झालेल्या सहाव्या सामन्यात विंडिजचा सलामीवीर आंद्रे फ्लेचर या मानेला बाऊन्सर चेंडू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुलना टायगर्सकडून खेळणारा फ्लेचर १६ धावांवर फलंदाजी करत असताना चट्टोग्राम चॅलेंजर्सचा गोलंदाज रझाउर रहमान राजाचा बाउन्सर चेंडू त्याला लागला आणि हा प्रसंग घडला.
खेळताना चेंडू फ्लेचरच्या हेल्मेटच्या ग्रीलच्या खालून त्याच्या मानेवर आदळला. त्या धक्क्याने तो वेदनेने आक्रोश करत जमिनीवर कोसळला. जमिनीवर पडला असताना त्याला प्रथमोपचार देण्याचे प्रयत्न सुरू होते. पण त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून फार वेळ न दवडता त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर घेऊन गेले आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापतग्रस्त फ्लेचरचा बदली म्हणून सिकंदर रझाने फलंदाजी केली.
फ्लेचर जेव्हा मैदानावर पडला तेव्हा फ्लेचरचे निरीक्षण करून डॉक्टरांनी तो बरा असल्याचं सांगितलं होतं. पण फ्रँचायझी मॅनेजर नफीस इक्बाल यांनी सांगितलं की फ्लेचरला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात नेण्यात आलं. डोकं किंवा त्याच्या आजूबाजूला चेंडू लागून होणारी दुखापत धोकादायक ठरू शकते त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. तसेच, फ्लेचरची तब्येत बरी असून चिंता करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.
३४ वर्षीय फ्लेचर हा विंडिजचा सलामीवीर आहे. तो तडाखेबाज फलंदाजी करण्यास प्रसिद्ध आहे. नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत त्याचा विंडिज संघात समावेश होता.