IND vs AUS वन-डे क्रिकेट मालिका सध्या भारतात सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी दुसऱ्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला १० विकेट्सने धूळ चारली. दोन्ही सलामीवीरांनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे भारतीय क्रिकेटरसिकांना धक्काच बसला. पण भारतातच दुसऱ्या एका क्रिकेट सामन्यात मात्र खरोखरच एक दुर्दैवी घटना घडली. गुजरातमधील राजकोट येथील क्रिकेट मैदानावर एका ४५ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याने मृत्यू झाला. तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता, तेव्हा अचानक काहीतरी झाले आणि जमिनीवर कोसळला.
नक्की काय घडले?
45 वर्षीय मयूर राजकोटच्या रेसकोर्स मैदानाच्या शास्त्री मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळताना तो अचानक नर्व्हस झाला. यानंतर तो काही अस्वस्थ दिसला आणि जमिनीवर बसायच्या प्रयत्नात असतानाच कोसळला. घडलेल्या प्रकारामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. लगेच त्याच्या सहकाऱ्यांनी अॅम्ब्युलन्स बोलावून त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या साथीदारांनी सांगितले की, मयूर हा सोन्याचा व्यापारी होता आणि तोच घरातच काम करून कमावणारा होता. मयूरने कोणत्याही प्रकारची नशा केली नसल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अचानक घडलेल्या या वेदनादायक घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
हृदयविकाराचे झटके येण्याच्या प्रकारात वाढ
याआधी गुजरातमधील अहमदाबादमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका जीएसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतीचे कर्मचारी यांच्यात हा सामना सुरू होता. गोलंदाजी करताना जीएसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली आणि तो जमिनीवर कोसळला. गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. भयावह बाब म्हणजे या प्रकरणांमध्ये बहुतांश लोक हे तरुण आहेत. २५ फेब्रुवारी रोजी तेलंगणातील नांदेडमध्ये एका तरुणाचा नाचताना मृत्यू झाला होता. त्यांचे वय अवघे १९ वर्षे होते. यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना एका पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानावर अशाप्रकारे ४५ दिवसांतील हा ८ वा मृत्यू ठरली.