मुंबई : मैदानात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी कधी खेळाडूंना इथे आनंद मिळतो, तर कधी दु:ख. काहीवेळा तर खेळाडूंवर मैदानातच जीव गमावण्याची पाळीही येते. भारतामध्ये अशीच एक घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे.
मैदानात एका सराव सामन्यात हा क्रिकेटपटू क्षेत्ररक्षण करत होता. क्षेत्ररक्षण करत असतानाच तो मैदानात कोसळला. ही गोष्ट खेळाडूंच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. जमिनीवर कोसळल्यावर खेळाडूंनी त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अगरतला येथे महाराजा वीर विक्रम क्रिकेट स्टेडियममध्ये त्रिपुराचा २३ वर्षांखालील संघ सराव सामना खेळत होता. त्यावेळी ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. मिथुन देबबर्मा या खेळाडूला मैदानातच हार्ट अॅटॅक आला आणि त्याला जीव गमावल्याची घटना मंगळवारी घडल्याचे 'दैनिक जागरण'ने दिले आहे.