कोलकाता : भारताची निवड समिती गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. आता तर निवड समिती सदस्यांबाबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय क्रिकेट निवड समिती सदस्याचा अपमान करून थेट बाहरेचा रस्ता दाखवल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारताने काही दिवसांपूर्वी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा केली होती. यावेळी संघात सतत अपयशी ठरणाऱ्या रिषभ पंतबाबत निवड समितीने मोठा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघात पुनरागमन करायचे असेल, तर त्याला काय करावे लागेल, याबाबत निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी एक वक्तव्य केले होते.
देवांग गांधी हे पूर्व विभागाचे निवड समिती सदस्य आहेत. सध्या कोलकाता येथील इडन गार्डन्सवर बंगाल आणि आंध्र प्रदेश यांच्यामध्ये रणजी करंडकातील सामना सुरु आहे. हा सामना पाहायला गांधी आले होते. पण यावेळी बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने गांधी यांची तक्रार केली आणि त्यामुळेच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची चर्चा आहे.
गांधी हे बंगालच्या पॅव्हेलियनमध्ये दाखल झाले होते. ही गोष्ट मनोजला आवडली नाही. त्याने या गोष्टीची तक्रार बीसीसीआयच्या भ्रष्टाचार निर्मुलन अधिकाऱ्याकडे केली. मनोजने नियमानुसार ही तक्रार केली होती. त्यामुळे गांधी यांना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पॅव्हेलियनमधून बाहेर काढले.