Ireland vs England: क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे असं म्हणतात. त्याचा प्रत्यय कायमच चाहत्यांना आणि खेळाडूंना येत असतो. T20 World Cup 2022 मध्ये भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा अगदी शेवटच्या टप्प्यात पराभव केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसारखा बलाढ्य संघ झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात पावसामुळे विजय मिळवू शकला नाही. दोन्ही संघांना १-१ गुण विभागून देण्यात आले. त्यानंतर बुधवारी विश्वचषक स्पर्धेत एक धक्कादायक निकाल आला. आयर्लंडच्या संघाने कागदावर बलाढ्य वाटणाऱ्या इंग्लंडच्या संघाचा ५ धावांनी पराभव करत साऱ्यांनाच थक्क केले. या आश्चर्यकारक निकालामुळे बाकीचे संघ थक्क झाले असले, तरी Team India च्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. त्याचं कारण आहे एक विशिष्ट योगायोग. जाणून घेऊया त्याबद्दल-
इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात आज आयर्लंडने साऱ्यांनाच थक्क केले. इंग्लंडने नाणेफेक जिंकली, पण त्यानंतर कोणतीच गोष्ट त्यांच्या बाजूने घडली नाही. आयर्लंडच्या संघाने सुरूवातीपासूनच तुफान फटकेबाजी केली. कर्णधार बलबर्नी याने ४७ चेंडूत ६२ धावा करत दमदार अर्धशतक ठोकले. लॉर्कन टकरनेही ३४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे आयर्लंडनने १५७ धावांची मजल मारली.
इंग्लंडची मात्र १५८ धावांचा पाठलाग करताना तारांबळ उडाली. जोस बटलर, अलेक्स हेल्स, बेन स्टोक्स यांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. डेव्हिड मलानने ३७ चेंडूत ३५ तर ब्रूक्स २१ चेंडूत १८ धावा करत सामन्यातील आव्हान जिवंत ठेवले. मोईन अलीने त्यानंतर फटकेबाजीला सुरूवात केलीच होती, पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला. त्यावेळी १४.३ षटकात इंग्लंडची धावसंख्या ५ बाद १०५ इतकीच झाली. त्यामुळे डकवर्थ लुईस पद्धतीप्रमाणे आयर्लंडला ५ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
भारतासाठी आयर्लंडचा विजय महत्त्वाचा का? जाणून घ्या...
इंग्लंड आणि आयर्लंड हे दोन संघ भारताच्या गटात नसूनही भारतीय फॅन्स या निकालाने खुश का झाले आहेत, याचे उत्तर आता तुम्हाला सांगतो. आयर्लंडने इंग्लंडचा पराभव करणे हा क्रिकेटमधील धक्कादायक निकाल आहे. त्यातही वर्ल्ड कपच्या सामन्यात असे घडणे अधिकच धक्कादायक आहे. पण असे पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही आयर्लंडनने आश्चर्यकारकरित्या इंग्लंडला वर्ल्ड कप मध्ये पराभूत केले होते. इंग्लंडने त्या सामन्यात ५० षटकात ८ बाद ३२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडने ४९.१ षटकांतच ३२९ धावा करत सामना जिंकला होता. हा प्रकार २०११च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये घडला होता. त्यानंतर असा प्रकार घडला नाही. मुख्य बाब म्हणजे २०११चा विश्वचषक टीम इंडियाने जिंकला होता. त्यामुळे असाच योगायोग पुन्हा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये घडेल अशी आशा ठेवत भारतीय चाहते भलतेच खुश झाल्याचे दिसत आहे.