फिक्सिंगची क्रिकेटला लागलेली कीड अजूनही कायम असल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. वर्ल्ड कपसारख्या महत्वाच्या स्पर्धेत एका खेळाडूवर फिक्सिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी त्या खेळाडूवर चार आरोप करण्यात आले होते. या चारही आरोपांमध्ये तो दोषी आढळला असून त्याने हे चारही आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे त्याच्यावर आयसीसीने कडक कारवाई केली असून त्याच्यावर सात वर्षांची बंदी घालण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
टी-२० वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या महत्वाच्या सामन्यात हे फिक्सिंग करण्यात आले होते. या सामन्याचा कल कसा असेल, सामना कसे वळण घेईल, त्याचबरोबर या सामन्याचा निकाल काय लागेल, या गोष्टी ओमानच्या युसुफ अब्दुलरहीम अल बलुशी या खेळाडूने एका व्यक्तीला सांगितले होते. त्यामुळे त्याच्यावर आयसीसीने कडक कारवाई केली आहे. सामन्याशी निगडीत असलेल्या कोणत्याही गोष्टीवर बाहेरच्या व्यक्तीबरोबर भाष्य करणे, हा गुन्हा आहे. त्यामुळे आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
सध्याच्या घडीला ओमानमध्ये क्रिकेटला काही महिन्यांपासूनच सुरुवात झाली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओमानला मोठी मजल मारता आलेली नाही. पण त्यांनी टी-२० वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत स्थान मिळवले होते. ही त्यांच्यासाठी नक्कीच सकारात्मक बाब आहे.
याबाबत आयसीसीने सांगितले आहे की, " सामन्याबाबतची माहिती संघाबाहेरील व्यक्तीला देणे हा गुन्हा आहे. ही बाब क्रिकेटसारख्या सभ्य गृहस्थांच्या खेळासाठी फारच गंभीर आहे. पण यामध्ये एक चांगली गोष्ट घडली आहे. ओमानच्या एका खेळाडूने फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला असला तरी संघातील अन्य कोणत्याही खेळाडूंनी त्याला साथ दिलेली नाही. ओमानचा उर्वरीत संघ हा या साऱ्या गोष्टींपासून चार हात लांब आहे."