Wriddhiman Saha Ravi Shastri : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून अनेक ज्येष्ठ खेळाडूंना बाहेरची वाट दाखवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघातील अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) यालाही संघातून डच्चू देण्यात आला. त्यानंतर साहाने प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीवर (Saurav Ganguly) टीका केली. त्यानंतर आता एक स्क्रिनशॉट शेअर करत वृद्धिमान साहाने अजून एक गंभीर दावा केला होता. एका पत्रकाराने आपल्याला मुलाखत देण्यासाठी त्रास दिला असा आरोप वृद्धिमान साहाने केलाय. दरम्यान, यानंतर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
'साहा आताही बीसीसीआयसोबत कंत्राट असलेला खेळाडू आहे. त्याच्या आरोपांना गंभीरतेनं घेत बीसीसीआयनं चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी कोणत्या खेळाडू सोबतही अशी घटना घडलीये का याचाही तपास केला जाईल,' असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलं आहे.
दरम्यान, रवी शास्त्री यांनीदेखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. "हे प्रकरण विचार करायला लावण्यासारखं आहे. एका खेळाडूला एक पत्रकार धमकावत आहे. असा प्रकार म्हणजे आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यासारखं आहे," असं त्यांनी एका पोस्टमध्ये नमूद केलंय.
"माझ्यासोबत एक मुलाखतीचा कार्यक्रम कराल का, जर तुम्ही लोकशाहीवादी बनू इच्छित असाल तर मी त्यासाठी तुमच्यावर दबाव आणणार नाही. त्यांनी केवळ एका यष्टीरक्षकाची निवड केली आहे. तू ११ पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केला. ही बाब माझ्या मते योग्य नाही. त्यांची निवड करा जे तुमची अधिकाधिक मदत करू शकतील. तू कॉल केला नाहीस. मी आता तुझा कधीही इंटरव्यू घेणार नाही आणि ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवेन," असं त्यात लिहिल्याचं दिसत आहे.