मुंबई - टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याने आपली व्यथा जगासमोर मांडली आहे. संघातून वगळल्यामुळे असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीचा इतिहास त्याने सांगितला. एका मुलाखतीत बोलताना, भारतीय संघासाठी खेळने ही प्रत्येक खेळाडूंसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्यामुळे मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो होतो, असे प्रवीण कुमारने सांगितले.
सन 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या सीबी सामन्यांच्या मालिकेत प्रवीण कुमारने लक्षणीय कामगिरी केली होती. मात्र, संघातून बाहेर करण्यात आल्यानंतर प्रवीणकुमार अतिशय तणावात होते. त्यावेळी, बंदुकीच्या गोळीने स्वत:ला संपवून टाकावे, अशी भावना माझ्या मनात होती, असेही प्रवीणने सांगितले. आयुष्यात अनेक धक्के बसले, त्याचदरम्यान मी दारू पीतो असेही कारण मला सांगण्यात आले. पण, कोण पीत नाही? लोकांनी अशी धारणाच बनवून ठेवलीय. मग, अनेक चांगली कामे करतो, त्याकडे का पाहात नाहीत.
मी नवीन तरुण मुलांना स्पाँसर करतो, जवळपास 10 मुलींचे लग्न लावून देण्याच काम मी केलंय. अनेक किकेटर्संना आर्थिक मदतही केली आहे. भारतामध्ये तुमच्याबद्दल एक वातावरण निर्माण केलं जातं. तसंच, माझ्याबद्दल चुकीचं वातावरण निर्माण केलंय. ती वातावरणनिर्मिती झाली की, पुन्हा तुम्ही काहीही करू शकत नाहीत. याच तणावातून मी स्वत:ला संपविण्याचा विचार करत होतो.
जेव्हा मी स्वत:वर गोळी झाडून घेण्याचा विचार करत होतो. त्याचवेळेस, गाडीत असलेल्या माझ्या मुलांच्या फोटोवर माझी नजर पडली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मीतहास्य होते. त्यांचा तो फोटो पाहून मी माझ्या लहान मुलांसाठी तरी हे धाडस करू शकत नाही. त्यानंतर, तो विचार मी डोक्यातून कायमचा काढून टाकला, असे प्रवीण कुमारने सांगितले.