नवी दिल्ली : क्रिकेट हा खेळ धावांसाठी जास्त ओळखला जातो. कारण चाहते धावांचा पाऊस पाहायला एकच गर्दी करतात. चौकार आणि षटकारांची अतिषबाजी चाहत्यांना मंत्रमुग्ध करते. पण नुकत्याच झालेल्या एका सामन्यात संपूर्ण संघ फक्त 9 धावांवर ऑलआऊट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका संघाने फक्त 9 धावा कराव्यात ही गोष्ट न पचणारी आहे. कारण क्रिकेटच्या मैदानात कधीकधी तर दोन चेंडूंमध्येही 9 धावा काढल्या जातात. पण फक्त 9 धावांवर संघ ऑलआऊट व्हावा, ही गोष्ट धक्कादायक अशीच. पण यापेक्षा अजून एक धक्का असा आहे की या संघातील फक्त एकाच खेळाडूला धावा करता आल्या. एका खेळाडूने सहा धावा केल्या आणि तीन धावा अतिरीक्त मिळाल्या. त्यामुळेच या संघाला 9 धावा करता आल्या. या गोष्टीचा अर्थ असा आहे की, संघातील 10 फलंदाजांना एकही धाव करता आली नाही.
आता तुमची उत्सुकता वाढली असेल की, हा सामना नेमका कुठे आणि कोणत्या संघांमध्ये झाला. हा सामना भारतामध्येच झाला. हा महिलांचा एक ट्वेन्टी-20 सामना होता, जो मिझारम आणि मध्य प्रदेश या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात मिझोरमच्या संघाला फक्त 9 धावाच करता आल्या. मिझोरमचा संघ 13.5 षटकांत सर्व विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 9 धावाच करू शकला. मिझोरमच्या संघाकडून धावा करणारी एकमेव फलंदाज ठरली ती अपूर्वा भारद्वाज. या सामन्यात अपूर्वाने 25 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने 6 धावा केल्या, संघातील अन्य फलंदाजांना यावेळी एकही धाव करता आली नाही. मध्य प्रदेशकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली ती तरंग झा. तरंगने या सामन्यात चार षटके टाकली. या चार षटकांमध्ये तरंगने फक्त दोन धावा देत चार विकेट्स मिळवले. मध्य प्रदेशच्या संघाने मिझोरमचे हे आव्हान एकही फलंदाज न गमावता 10 चेंडूंमध्येच पूर्ण केले.मध्य प्रदेशला जिंकायला 10 धावा हव्या होत्या.या 10 पैकी 5 धावा त्यांना वाईडच्या स्वरुपात मिळाल्या.