नवी दिल्ली : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना आला आहे. ही घटना घडली आहे ती इंग्लंडमध्ये, जिथे एक संघ अवघ्या 18 धावांवर तंबूत परतला. हा आतापर्यंचा क्रिकेटमधील निचांक ठरला आहे. या आव्हानाचा पाठलाग दुसऱ्या संघाने फक्त 12 मिनिटांमध्ये पूर्ण केला.
इंग्लंडमधील सेफर्ड नीम केंट क्रिकेट लीगमध्ये ही गोष्ट घडली आहे. हा सामना रंगला तो बॅकेनहॅम आणि बेक्सले सीसी या दोन संघांमध्ये रंगला. या सामन्यात बॅकेनहॅम संघाची पहिली फलंदाजी होती. बेक्सले संघाने यावेळी भेदक मारा केला आणि बॅकेनहॅम संघाचा डाव फक्त 18 धावांवर संपुष्टात आला. बॅकेनहॅम संघाच्या 152 वर्षांच्या इतिहासातील ही निचांकी धावसंख्या आहे. बॅकेनहॅम संघातील सहा फलंदाजांना खाते उघडता आले, तर पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
बेक्सले संघाकडून कॅलम मॅक्लियॉडने अचूक आणि भेदक मारा करत पाच धावांमध्ये सहा फलंदाजांना बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना बेक्सले संघाने एकही बळी गमावला नाही. हे आव्हान बेक्सले संघाने 3.3 षटकांत पूर्ण केले.