भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अखेरच्या टप्प्यात संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या वागणुकीमुंळे युवराज प्रचंड निराश झाला होता. दोन दशकं त्यानं टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आणइ 2011च्या वर्ल्ड कप विजयी संघाचा तो खरा नायक होता. युवीनं संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या वागणुकीवर टीका केली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यानं संघ व्यवस्थापनाने त्याच्या निवडीबाबत कसा यू टर्न मारला, हे जगाला सांगितले.
निवृत्ती घेतल्यानंतर युवीनं संघ व्यवस्थापनाच्या दुटप्पीपणा जगासमोर आणण्याचा निर्धार केला आहे. तो म्हणाला,'' चॅम्पियन्स ट्रॉफीसह खेळलेल्या 8-9 सामन्यांपैकी दोन सामन्यांत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावूनही संघाबाहेर बसावे लागेल याची कल्पना केली नव्हती. मला दुखापत झाली आणि त्यानंतर श्रीलंका मालिकेसाठी तयारी कर, असे सांगण्यात आले. त्यानंतर अचानक Yo-Yo टेस्टच भूत आणलं गेलं. त्यावरून माझ्या निवडीवर यू टर्न मारण्यात आला. वयाच्या 36व्या वर्षी मी Yo-Yo टेस्टच्या तयारीला लागलो आणि त्यात मी पासही झालो. पण, मला तेव्हा स्थानिक क्रिकेट खेळण्यास सांगितले. त्यांना असे वाटत होतं की मी Yo-Yo टेस्ट पास करू शकणार नाही आणि मला ते सहज संघाबाहेर करू शकतील. पण, मी पास झालो.''
2011साली कँसरशी झगडणाऱ्या युवीनं दमदार कमबॅक केले. त्यानं जानेवारी 2015 ते जून 2017 या कालावधीत 11 वन डे सामन्यांत 41.33च्या सरासरीनं 372 धावा केल्या होत्या. त्यात इंग्लंडविरुद्धच्या 150 धावांच्या वादळी खेळीचा समावेश होता.