मॅन्चेस्टर : विश्वचषकातील सर्वांत मोठा सामना असलेल्या भारत- पाकिस्तान लढतीचा थरार रविवारी मॅन्चेस्टर मैदानावर रंगणार आहे. या सामन्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतीय खेळाडूंना काही मोलाच्या टिप्स दिल्या. रविवारच्या सामन्यात पाकचा गोलंदाज मोहम्मद आमीर याच्याविरुद्ध सावध राहून आक्रमक वृत्तीने फलंदाजी करा, असे सचिनने फलंदाजांना आवाहन केले.
भारतीय संघ स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. पारंपरिक कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध देखील विजयाचा दावेदार मानला जातो. सामन्याच्या निमित्ताने इंडिया टुडेशी बोलताना सचिन म्हणाला,‘ मी आमीरविरुद्ध चेंडू सोडून देत नकारात्मक वृत्ती दाखविणार नाही. भारतीय खेळाडूंनी आक्रमक फटके मारावेत यासाठी मी प्रोत्साहन देणार आहे. बचावात्मक खेळायचे झाले तरीही सकारात्मक वृत्तीनेच खेळा. वेगळे काहीही करण्याची गरज नाही. सर्वच बाबतीत आक्रमकता बाळगण्याची खरी गरज आहे. सामन्यात शारीरिक हालचाली देखील विजयासाठी महत्त्वाच्या ठरतात, हे विसरु नका. संघांच्या धावांचा बचाव करण्यासाठी विश्वासाने मारा कसा करावा, याची गोलंदाजांना देखील जाणीव आहे.’
पाकिस्तान रविवारी कोहली आणि रोहित यांना‘टार्गेट’ करेल, असे सचिनला वाटते. सचिन पुढे म्हणाला, ‘रोहित आणि विराट हे अनुभवी खेळाडू असल्याने या दोघांना झटपट बाद करण्यासाठी पाकचे खेळाडू जीवाचा आटापिटा करतील, यात शंका नाही.’ (वृत्तसंस्था)