Join us  

सलग दोन वाइडसाठी फ्री हिट मिळायला हवी: सुनील गावसकर

गावसकरांच्या अनोखा सल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 8:07 AM

Open in App

नवी दिल्ली : नव्या नियमांनुसार २०२३ च्या आयपीएलला सुरुवात झाली. यंदाच्या हंगामापासून आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअरपासून ते नो बॉल आणि वाइड बॉलवर रिव्ह्यू घेण्यापर्यंत नवे नियम आलेले आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि विद्यमान समालोचक सुनील गावसकर यांनी एक अनोखा सल्ला देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. सुनील गावसकरांच्या म्हणण्यानुसार, सलग दोन वाइड बॉल टाकल्यानंतर फ्री हिट मिळायला हवी.

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात गोलंदाजांनी काही अतिरिक्त धावा दिल्या, ज्यावर सुनील गावसकर यांनी हा पर्याय सुचवला. चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने आपल्या पहिल्याच षटकात ३ वाइड आणि २ नो बॉल टाकले होते. त्यानंतर १२ व्या षटकात दीपक चाहरने सलग तीन वाइड टाकले आणि याचदरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी म्हटले, दोन सलग वाइड बॉल टाकल्यानंतर फ्री हिट मिळायला हवी.

जेव्हा गावसकरांनी हे विधान केले तेव्हा तिथे सायमन डोल आणि इयान बिशप हेदेखील उपस्थित होते. त्यांनी गावसकरांच्या विधानाला नकळत विरोध दर्शवला; पण गावसकरांच्या म्हणण्यानुसार, २ वाइड बॉल टाकल्यानंतर एक फ्री हिट दिल्यास गोलंदाज आपल्या लाइन आणि लेंथवर लक्ष केंद्रित करेल. चेन्नईच्या गोलंदाजांनी सतत वाइड आणि नो बॉल टाकल्याने धोनीने नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला, जर गोलंदाजांनी पुढेदेखील असेच वाइड आणि नो बॉल टाकले तर कर्णधारपद सोडून देईन. 

टॅग्स :आयपीएल २०२३सुनील गावसकरमहेंद्रसिंग धोनी
Open in App