मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोर धरू लागली आहे. 38 वर्षीय धोनीचा हा कारकिर्दीतील अखेरचा वर्ल्ड कप असल्याचे बोलले जात आहे. पण, आणखी एक वर्ल्ड कप उंचावण्याचे धोनीचे स्वप्न अपूर्ण राहिले. वर्ल्ड कप स्पर्धेतील धोनीची कामगिरी पाहता त्यानं निवृत्ती घ्यावी, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंही धोनीच्या निवृत्तीवर स्पष्ट मत मांडले आहे.
ICC World Cup 2019 : भारताच्या पराभवावर शोएब अख्तर म्हणतो...
240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीच्या 45 मिनिटांच्या निशाराजनक कामगिरीचा भारतीय संघाला मोठा फटका बसला. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 5 धावांत तंबूत परतले होते. हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी संघर्ष केला, परंतु अनुभवाची उणीव आणि अतीघाई त्यांना नडली. भारताने सहा फलंदाज 96 धावांत तंबूत परतले होते. भारताचा पराभव हा डोळ्यासमोरच दिसत होता, परंतु महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी 116 धावांची भागीदारी करून पुन्हा आशा पल्लवीत केल्या. पण, 48व्या षटकात जडेजा बाद झाला आणि त्यानंतर धोनी धावबाद होऊन माघारी परतला. त्यामुळे भारताला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. किवीच्या मार्टिन गुप्तीलनं धोनीचा धावबाद करून भारताच्या आशांवर पाणी फिरवलं.
ICC World Cup 2019 : मानो या ना मानो; पण विराटसेनेचं जे झालं ते 'स्व-लिखित'च होतं!
धोनीच्या निवृत्तीवर तेंडुलकर म्हणाला,'' तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. त्याला निर्णय घेण्याची प्रत्येकाने मोकळीक द्यायला हवी आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यानं दिलेल्या योगदानाचा आदर करायला हवा. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबवा. देशासाठी इतकं योगदान दिल्यानंतर त्याला त्याचा निर्णय घेऊद्या.''
Video : महेंद्रसिंग धोनीच्या 'त्या' अश्रूंनी तमाम क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी
''त्याच्यासारखी क्रिकेट कारकीर्द गाजवणारे किती जणं आहेत? लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास आणि त्याला मिळत असलेला पाठिंबा हेच सिद्ध करतो की त्यानं देशासाठी किती योगदान दिलं आहे. तो अजूनही मॅच फिनिशर आहे, असा लोकांचा विश्वास आहे. तो मैदानावर असेपर्यंत सामना जिंकू असे वाटत होते,'' असेही तेंडुलकर म्हणाला.