भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियाई देशांना ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या साखळी फेरीतूनच माघारी परतावे लागले. यूएईच्या धरतीवर होत असलेल्या महिलांच्या विश्वचषकात स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. २०१६ नंतर प्रथमच टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला पण त्यांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.
विश्वचषकादरम्यान पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना फार चर्चेत राहिली. २२ वर्षीय फातिमाच्या नेतृत्वातील पाकिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला नमवून विजयी सलामी दिली. पण त्यानंतर सनाला तिच्या वडिलांचे निधन झाल्याने मायदेशी परतावे लागले. त्यामुळे तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळता आला नाही. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ती पुन्हा यूएईत दाखल झाली. भारताची अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटीलने खेळभावना दाखवताना फातिमाला एक भेट दिली, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पाकिस्तानी कर्णधाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर याची झलक शेअर केली आहे.
श्रेयांका पाटीलने फातिमाला एक चित्र भेट दिले. यामध्ये लिहिले आहे की, तुला जे आवडेल ते तू कर... श्रेयांका ३१. श्रेयांकाने दिलेली ही भेट चाहत्यांसाठी शेअर करत फातिनाने म्हटले की, या अप्रतिम गिफ्टसाठी आणि चांगल्या संदेशासाठी तुझे आभार श्रेयांका. त्यानंतर श्रेयंकाने फातिमाने शेअर केलेला फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आणि म्हटले की, फातिमा तू खूप प्रेमळ आहेस. तुला पुन्हा भेटण्याची वाट पाहू शकत नाही.
दरम्यान, भारताच्या महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया उपांत्य फेरी गाठू शकली नाही. २०१६ नंतर प्रथमच भारतीय संघाला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आली नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर त्यांना सर्वच स्तरातून ट्रोल केले जात आहे. खरे तर टीम इंडियाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून आणखीच प्रसिद्धी मिळाली. भारताला सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून तर अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.