ACC Women's Emerging Teams Cup | नवी दिल्ली : हाँगकाँगमध्ये खेळल्या गेलेल्या आशियाई क्रिकेट काउन्सिल महिला इमर्जिंग टीम्स कपमध्ये भारत अ महिला संघाने बांगलादेशचा पराभव करून किताब उंचावला. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १९.२ षटकांत केवळ ९६ धावांवर सर्वबाद झाला अन् भारताने किताब पटकावला. श्रेयांका पाटीलच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ पूर्णपणे चीतपट झाला. तिने ४ षटकांत केवळ १३ धावा देऊन ४ बळी पटकावले.
भारताने ३१ धावांनी सामना आपल्या नावावर केला. भारत अ महिला संघाकडून प्रथम फलंदाजी करताना दिनेश वृंदा (३६) आणि कनिका आहूजा (३०) यांनी सावध खेळी करून सन्मानजनक लक्ष्य उभे केले. भारतीय कर्णधार श्वेता सेहरावत (१३) आणि यष्टीरक्षक फलंदाज यू चेत्री (२२) स्वस्तात माघारी परतल्याने भारताची डोकेदुखी वाढली होती. पण आव्हानाचा बचाव करताना श्रेयांका पाटील एकटी बांगलादेशवर भारी पडली अन् तिने ४ महत्त्वाचे बळी घेतले.
बांगलादेशसाठी श्रेयांका ठरली काळ १२८ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा संघ संपूर्ण २० षटके देखील खेळू शकला नाही. भारतीय संघाकडून श्रेयांका पाटील हिरो ठरली. तिने एकाच षटकात २ बळी घेऊन बांगलादेशच्या फलंदाजीची कंबर मोडली. श्रेयांकाने तिच्या ४ षटकांत १३ धावा देऊन ४ बळी घेतले. याशिवाय मन्नत कश्यपने देखील कमाल करत ४ षटकांत २० धावा देत ३ बळी घेतले.