-अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर युवा ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी स्थानिक क्रिकेटकडे पाठ फिरविली. ईशान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ईशानला स्थानिक सामने खेळण्याचा सल्ला दिला. यादरम्यान खेळाडू आणि व्यवस्थापनात काही बिनसले का? याचीही चर्चा झाली. द्रविडचा सल्ला धुडकावून ईशान थेट हार्दिक पांड्यासोबत सराव करायला गेला. ही मनमानी नाही काय? तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहात आणि स्थानिक क्रिकेटला खेळाडू प्राधान्य देत नाहीत, तर यातून चांगला संदेश जात नाही.
श्रेयस अय्यरने इंग्लंडविरुद्ध सुरुवातीला कसोटी खेळल्यानंतर पाठदुखीचे कारण पुढे केले. त्यामुळे पुढील तीन कसोटींसाठी त्याच्या नावाचा विचार न करता ‘बीसीसीआय’ने त्याला ‘एनसीए’त उपचार घेण्यास सांगितले होते. ‘एनसीए’च्या अहवालात श्रेयस चक्क फिट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही त्याने मुंबईकडून रणजी सामना खेळण्याचे टाळले. आयपीएल डोळ्यापुढे ठेवूनच त्याने हे केले असावे. यात नुकसान तर खेळाडूंचेच आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये मोठी स्पर्धा आहे. प्रतिभावानांची उणीव नसल्याने हे खेळाडू स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत. उदा. रणजी उपांत्यपूर्ण सामन्यात १८ वर्षांच्या मुशीर खानने बडोद्याविरुद्ध मुंबईसाठी चक्क द्विशतक ठोकले. इतकी स्पर्धा असेल तर मग तुम्ही फिट असाल तरी तुम्ही पुनरागमन कसे करू शकाल? स्वत:ला आंतरराष्ट्रीय म्हणविणाऱ्यांनी तर आदर्श उदाहरण पुढे ठेवायला हवे. स्थानिक क्रिकेटला कमी लेखणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. खेळाडूंनी स्वत: हे समजून घ्यावे.
स्थानिक क्रिकेटमध्ये चमक दाखविणाऱ्या अन्य खेळाडूंवर नंतर तुमच्यामुळेच अन्याय होऊ शकतो, हे ध्यानात घ्या. जखमी खेळाडूंसाठीही ‘बीसीसीआय’चे स्पष्ट दिशानिर्देश असावेत. जे खेळाडू स्थानिक क्रिकेटला ठेंगा दाखवीत असतील, त्यांना योग्य शिक्षा न मिळाल्यास इतरांसाठी तसा संदेश जाऊ शकणार नाही.
जसप्रीत बुमराहचा निर्णय फसला? वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला चौथ्या कसोटीतून ‘वर्कलोड व्यवस्थापनाच्या’ नावाखाली विश्रांती दिली. बुमराह रनअप घेतो तेव्हाच फलंदाज घाबरलेले असतात. १७ गडी बाद करणारा बुमराह २-१ मालिकेत आघाडी मिळूवन देतो, त्याला बाहेर बसविणे योग्य नाही. चौथ्या कसोटीत इंग्लंडने ११२ धावांत ५ फलंदाज गमावले. त्यानंतरही ३५३ पर्यंत मजल गाठली. बुमराह असता तर इतक्या धावा होऊ शकल्या नसत्या. माझ्या मते, भारताने फिरकीची खेळपट्टी समजून असे केले असावे. आकाश दीप आणि मोहम्मद सिराजच्या कामगिरीत बुमराहचे योगदान जोडले तर फरक पडला असता. तीनही वेगवान गोलंदाज भारी पडले असते. पाचव्या कसोटीत त्याला संधी दिली असती तर समजू शकलो असतो; पण मालिका अद्याप भारताकडे झुकलेली नसताना असे का केले? ही कृती योग्य नव्हतीच. आता भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीच्या चुरशीकडे लक्ष वेधतो. इंग्लंड पहिल्या डावात आघाडीकडे कूच करीत आहे; पण त्यांना हवी तशी आघाडी मिळेल असे वाटत नाही. पाहुण्या संघाने ९० किंवा त्याहून अधिक धावांची आघाडी घेतली तर त्याचा त्यांना लाभ होईल. त्याचवेळी ध्रुव जुरेल-कुलदीप यादव यांनी गोलंदाजांना झुंजवल्यास २०-३० धावांनीच भारत माघारेल. अशावेळी सामना बरोबरीचा असेल. जुरेलच्या तंत्रशुद्ध खेळावर आणि फटक्यांवर मी फारच प्रभावित झालो आहे.