नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध मैदानात उतरेल. टी-२० विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर पुन्हा एकदा विजय मिळवून जगाला धक्का देण्याच्या तयारीत पाकिस्तानचा संघ असेल. या बहुचर्चित स्पर्धेसाठी दोन्ही देशातील संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेसाठी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि के.एल राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र काही स्टार खेळाडूंना या संघातून वगळण्यात आले आहे.
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा त्या खेळाडूंमध्ये समावेश आहे, ज्यांना आशिया चषकाच्या संघातून डावलण्यात आले आहे. श्रेयस अय्यरला स्टॅंड-बॉयच्या यादीत स्थान मिळाले आहे तर किशनला यातून देखील वगळण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या सध्या तरी टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लागला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हाच संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी असू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.
श्रेयसच्या नावावर सर्वाधिक धावा
भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये २०२२ च्या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत श्रेयस आणि ईशान अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अय्यरने १४ सामन्यांमध्ये ४४९ धावा केल्या असून यामध्ये ४ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये अय्यरने शानदार अर्धशतक ठोकले होते.
रोहित-सूर्या दोघांच्याही मागे
ईशान किशनबद्दल भाष्य करायचे झाले तर त्याने २०२२ मध्ये आतापर्यंत १४ टी-२० सामन्यांमध्ये ४३० धावा केल्या आहेत. तर भारताकडून या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार तिसऱ्या स्थानावर स्थित आहे. सूर्यकुमार यादवने १२ टी-२० मध्ये २३० धावा केल्या आहेत. तर कर्णधार रोहित शर्माने १३ सामन्यांमध्ये २९० धावा बनवल्या आहेत. तसेच १२ सामन्यात २८१ धावा करणारा हार्दिक पांड्या या यादीत चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
Web Title: Shreyas Iyer and Ishan Kishan, despite scoring the most runs, were not included in the Asia Cup squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.