व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, विराट कोहली व भुवनेश्वर कुमार यांनी दुसऱ्या वन-डे लढतीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना युवा खेळाडूंपुढे अनुभवी असल्याचा आदर्श ठेवला. कारकिर्दीतील ४२ वे वन-डे शतक पूर्ण करताना विराटची फलंदाजी बघण्यासारखी होती. काळानुरुप विराटची फलंदाजी अधिक परिपक्व होत आहे, ही आनंदाची बाब आहे.
भारतीय कर्णधाराची काही विशेषता आहे. देशातर्फे खेळताना त्याच्या खेळीत बाऊंड्रीज व्यतिरिक्त त्याचा अभेद्य बचावही अनुभवायला मिळतो. धावफलक हलता ठेवण्यासाठी पहिली धाव वेगाने पळत दुसरी धाव घेण्यासाठी सहकारी खेळाडूला पळवण्याचे कौशल्य बघण्यासारखे असते. विराटची सर्वांत मोठी विशेषता म्हणजे खेळपट्टीचे स्वरुप बघून त्यानंतर स्वत:चा खेळ करण्याची आहे. खेळपट्टीनुसार त्याची मानसिकता असते. त्यामुळेच तिन्ही प्रकारामध्ये तो यशस्वी ठरत आहे.
अय्यरला फलंदाजी करताना बघून आनंद झाला. राष्ट्रीय संघात पुनरागमन करणे सोपे नसते, पण भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना आकर्षक खेळी करीत तो अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरला. विराटसोबत प्रदीर्घ वेळ फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यामुळे या युवा खेळाडूला बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. दरम्यान, या उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूला प्रदीर्घ काळ संघात कायम राहण्याचा विश्वास मिळायला हवा. भुवीबाबत काय सांगायचे.
परिस्थिती व गरजेनुसार तो आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता आणण्यास सक्षम आहे. मोठे लक्ष्य गाठण्यासाठी वेस्ट इंडिज संघात अनुभवी फलंदाजांची वानवा आहे. गेल फॉर्मच्या शोधात आहे. इविन लुईसने नक्कीच धावा फटकावण्यात काही अंशी यश मिळवले. पण या युवा फलंदाजाने विराटला आदर्श मानत ५०-६० धावांच्या खेळीएवजी शतकावर लक्ष्य केंद्रित केले तर तो आपल्या भूमिकेला न्याय देऊ शकेल.