भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पुढच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीने संपूर्ण कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. तर रवींद्र जडेजा आणि के. एल. राहुल यांचं संघात पुनरागमन झालं आहे. मात्र मुंबईकर क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला संघातून बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने श्रेयस अय्यर याच्या बाहेर जाण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.
आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनलवर संवाद साधताना सांगितले की, श्रेयस अय्यर पुढील तीन कसोटी सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध होता. जर त्याची एका सामन्यासाठी निवड झाली नसती तरी उरलेल्या दोन सामन्यांसाठी त्याची निवड होऊ शकली असती. याचा अर्थ उपलब्ध असूनही निवड समितीने त्याला संधी दिली नाही. शुभमन गिलसुद्धा याच स्थितीत होता. मात्र तो वाचला.
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, विशाखापट्टणम येथील कसोटीत श्रेयस अय्यर शॉर्ट बॉल खेळताना मागे हटत होता. ही गोष्ट दिसायला चांगली दिसत नव्हती. जर तुम्ही असं खेळायला सुरुवात केली तर तुम्ही अशी फलंदाजी का करताय? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विश्वचषक स्पर्धेत श्रेयस अय्यरने खूप चांगला खेळ केला होता. मला वाटतं त्याचा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील फॉर्म कायम राहील. तो ज्या प्रकारे फलंदाजी करतो. ती जबरदस्त आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा १५ फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला जाईल. तर चौथा कसोटी सामना हा २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे आयोजित होणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघ सध्या १-१ अशा बरोबरीत आहेत.