मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यरने धडाकेबाज फलंदाजी केली. भारताच्या या विजयात श्रेयसने महत्वाचा वाटा उचलला होता. पण आता तर श्रेयस अय्यरने विराट कोहलीला संकटातून बाहेर काढले असल्याचे म्हटले जात आहे. पण हे प्रकरण नेमके आहे तरी काय...
टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यासह मालिकाही 2-1 अशी खिशात घातली. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला. दीपक चहरनं हॅटट्रिक घेत ट्वेंटी-20त प्रथमच पाच विकेट घेतल्या. या सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाने विशेष विमानासह नागपूर सोडल्याचे पाहायला मिळाले.
श्रेयसने या सामन्यात ३३ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली होती. या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन लवकर बाद झाल्यानंतर श्रेयस यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी श्रेयसने आपली जबाबदारी चोख निभावली होती.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाच्या शोधात होता. यापूर्वी रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. पण पंत चौथ्या क्रमांकावर अपयशी ठरला होता. त्यानंतर बरेच पर्याय भारतीय संघ व्यवस्थापनेने चाचपडून पाहिले होते. पण एकही योग्य पर्याय त्यांना मिळाला नव्हता. पण आता श्रेयसच्या रुपात भारताला चौथ्या क्रमांकावरील खेळाडू भेटला आहे. त्यामुळेच कर्णधार विराट कोहलीपुढे असलेला चौथ्या क्रमांकावरचा तिढा श्रेयसने सोडवला असल्याचे चाहते म्हणत आहेत.