Join us

शानदार... जबरदस्त!! श्रेयस अय्यरचं धडाकेबाज शतक, ठोकले १० षटकार, गोलंदाजांनी तुफान धुलाई

Shreyas Iyer Century, Mumbai vs Karnataka, Vijay Hazare Trophy: ३०व्या षटकात श्रेयस खेळायला आला अन् अफलातून फलंदाजी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 15:36 IST

Open in App

Shreyas Iyer Century, Mumbai vs Karnataka, Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यरने भारताच्या देशांतर्गत वनडे टूर्नामेंट विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली. मुंबईचा कर्णधार असलेल्या अय्यरने कर्नाटकच्या गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली. त्याने अवघ्या ५० चेंडूत शतक झळकावले. अय्यरने ५५ चेंडूत ११४ धावांची खेळी खेळली. त्यात त्याने १० षटकार आणि ५ चौकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३८२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर त्याने पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात आपला दावा सांगितला.

अहमदाबादमध्ये अय्यर नावाचे 'वादळ'

शनिवारी, २१ डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. स्पर्धेची पहिली फेरी सुरू झाली असून त्यात १८ सामने खेळले जाणार आहेत. क गटातील मुंबई आणि कर्नाटक यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला. या दरम्यान श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी दिसली. मुंबईचा कर्णधार ३०व्या षटकांत फलंदाजीला आला. त्यावेळी संघाची अवस्था २ बाद १४८ धावा होती. त्यानंतर अय्यरने दमदार फटकेबाजी केली.

अय्यरच्या बॅटमधून निघाले १० षटकार

अय्यरने पहिल्या ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या १९ चेंडूत दमदार शतक ठोकले. अय्यरने शेवटच्या ५ चेंडूंवर १४ धावा केल्या. अशा प्रकारे, त्याने केवळ ५५ चेंडूंचा सामना केला आणि २०७ च्या स्ट्राइक रेटने ११४ धावा केल्या. या काळात अय्यरने केवळ १३ निर्धाव चेंडू खेळले. त्याच्या डावातील ७० टक्के धावा चौकार षटकारातून आल्या. त्याने ५ चौकार आणि तब्बल १० षटकार खेचले.

शिवम दुबे चमकला, सूर्या अपयशी ठरला

कर्नाटकने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हा निर्णय त्यांना महागात पडला. मुंबईची सुरुवात संथ झाली आणि चौथ्या षटकात सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी बाद झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे आणि हार्दिक तामोरे जोडीने १४१ धावांची भागीदारी केली. आयुषने ८२ चेंडूत ७८ तर हार्दिकने ९४ चेंडूत ८४ धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या शतकाव्यतिरिक्त शिवम दुबेनेही चांगली खेळी केली. दुबेने केवळ ३६ चेंडूत १७५ च्या स्ट्राईक रेटने ६३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव मात्र १६ चेंडूत २० धावा करून माघारी परतला.

टॅग्स :विजय हजारे करंडकश्रेयस अय्यरसूर्यकुमार अशोक यादवमुंबईकर्नाटक