स्टायलिश अंदाजासाठी ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर. अय्यर सध्या भारताच्या क्रिकेट संघातून बाहेर आहे. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेला. अय्यर आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे. रणजी करंडक स्पर्धेत त्याने मुंबईकडून खेळताना महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात १९० चेंडूत १४२ धावांची खेळी केली. पण, अशातच अय्यरबद्दल एक वेगळी बातमी समोर आली. तो दुखापतीमुळे पुढील काही दिवस क्रिकेटपासून दूर राहू शकतो अशी चर्चा रंगली. यावर खुद्द श्रेयस अय्यरने व्यक्त होत अफवांचे खंडन केले आणि संताप व्यक्त केला.
श्रेयस अय्यरने दुखापतीचे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आणि आपली नाराजीही व्यक्त केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने सांगितले की, बातमी प्रकाशित करण्यापूर्वी थोडा तरी अभ्यास करत जा. एकूणच दुखापतीचे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे त्याने स्पष्ट केले... यासोबतच तो २६ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या त्रिपुराविरुद्धच्या सामन्यासाठीही पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे संकेत दिले.
टीम इंडियातून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. अय्यरने २०२१ मध्ये भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. याशिवाय त्याने वन डे संघातही आपले स्थान निश्चित केले होते, मात्र दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. एवढेच नाही तर अय्यरला केंद्रीय करारात जागा मिळाली नाही. मात्र, आता अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत टीम इंडियात पुनरागमन करण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, भारतीय संघात पुनरागमन करणे अय्यरसाठी कठीण असेल यात शंका नाही. सर्फराज खानसारख्या खेळाडूने मधल्या फळीत सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत सर्फराजला संघातून काढून अय्यरला परत आणणे निवडकर्त्यांसाठी धाडसी असेल. अशा परिस्थितीत अय्यरने रणजी करंडकमध्ये आपल्या संघासाठी धावा करत राहणे चांगले होईल जेणेकरून तो राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित करू शकेल.
Web Title: Shreyas Iyer expressed his displeasure at the injury fake news
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.