आशिया चषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला अन् त्यातून लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे पुनरागमन करणार आहेत. दोघंही बऱ्याच कालावधीपासून दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर होते. भारताच्या वन डे संघातील चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) हाच पहिली पसंती होता आणि त्याच्या फिट होण्याने संघाची ताकद वाढली आहे. पण, तरीही त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेच. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा ( २ सप्टेंबर) सामना करण्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
तंदुरुस्तीसाठी श्रेयस बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बराच कालावधीपासून आहे आणि १८ ऑगस्टला त्याने फिटनेस सिद्ध करण्यासाठी सराव सामनाही खेळला. त्याने ३८ षटकं फलंदाजी केली आणि १९९ धावांची खेळी केल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने BCCI च्या सूत्राचा हवाला देऊन दिले आहे. “त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजांची धुलाई केली आणि सराव सामन्यात १९९ धावा केल्या.
निवडकर्त्यांना त्याच्या तंदुरुस्तीचा अधिक पुरावा देण्यासाठी, त्यानंतर ३-४ दिवसांपूर्वी बंगळुरू येथील NCAमध्ये झालेल्या सामन्यात संपूर्ण५० षटकं त्याने क्षेत्ररक्षण केले,” असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले.त्याच अनुषंगाने, २१ ऑगस्ट रोजी आशिया चषकासाठी १७ सदस्यीय संघात त्याची निवड करण्यात आली.
निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत अय्यरच्या फिटनेसबद्दल खुलासा केला. टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून सुरुवात करेल. या स्पर्धेसाठी अधिक चांगली तयारी करण्यासाठी आणि सामन्यासाठी सज्ज राहण्यासाठी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) येथे ५ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा शुक्रवारी भारतीय संघात सामील होतील. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्यासह हे दोन गोलंदाज आयर्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेतील सदस्य होते आणि भारताने ही मालिका २-० अशी जिंकली.