Join us  

श्रेयस अय्यरला वार्षिक करार न मिळाल्याने KKR चे कोच नाराज; म्हणाले, तो भारतासाठी फायद्याचा

BCCI ने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारातून इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वगळले गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 12:18 PM

Open in App

देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करणाऱ्या क्रिकेटपटूंना धडा शिकवण्याचा निर्धार बीसीसीआयने केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच BCCI ने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारातून इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वगळले गेले. या दोघांनीही बीसीसीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि रणजी करंडक स्पर्धेपासून स्वतःला दूर ठेवले. बीसीसीआय कारवाई करणार हे समजताच श्रेयसने स्वतःला रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी उपलब्ध केले. पण, बीसीसीआयने करायची ती कारवाई केली. श्रेयसला वार्षिक करारातून वगळल्याचे कोलकाता नाइट रायडर्सचे कोच चंद्रकांत पंडित यांना वाईट वाटत आहे आणि त्यांनी या विषयावर स्पष्ट मत व्यक्त केले आहे. 

''वार्षिक करारात श्रेयसला अमूक एक ग्रेडमध्ये घ्या असं मला म्हणायचं नाही, परंतु भारताच्या सर्व फॉरमॅटमध्ये उपयोगी येणारा तो खेळाडू आहे. त्याला दुखापत झाली होती, परंतु त्यावर त्याने मात केली. तो चांगला खेळाडू आहे आणि कसोटी पदार्पणात ( १०५ वि. न्यूझीलंड, २०२१) त्याने शतक झळकावले आहे,''असे पंडित म्हणाले.  त्यांनी पुढे म्हटले की,''भविष्यात एखाद्या मालिकेत एखाद्या खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही, तर श्रेयस उपलब्ध आहे. तो देशांतर्गत क्रिकेट खेळेल आणि आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करू शकतो. भारतीय क्रिकेटला कोणत्याची फॉरमॅटसाठी तो उपयुक्त खेळाडू आहे.'' 

''वार्षिक करारासाठी श्रेयसच्या नावाचा विचार केला गेला नाही, याचे मला आश्चर्य वाटले, कारण तो भारताच्या सर्व फॉरमॅटच्या संघाचा खेळाडू आहे. मला यामागचं कारण माहीत नाही, परंतु माझ्या मते तो वार्षिक करारात असायला हवा होता. तो कोणत्याना कोणत्या ग्रेडमध्ये नक्कीच बसला असता. मी श्रेयसला चांगला ओळखतो, याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. तो फायटर आहे आणि तो दमदार पुनरागमन करेल,''असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :श्रेयस अय्यरकोलकाता नाईट रायडर्सबीसीसीआय