गेल्या काही काळापासून बीसीसीआय आणि इशान किशन यांच्यात वाद सुरु झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या इशाऱ्यानंतरही इशानने रणजीत खेळण्याचे टाळले आहे. तर दुसरीकडे, श्रेयस अय्यरनेही कंबरदुखीचा बहाणा करून रणजी स्पर्धा खेळणे टाळले होते. आता यावर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने मोठा खुलासा केला असून श्रेयस खोटे बोलल्याचे समोर आले आहे.
खराब फॉर्ममध्ये असलेल्या अय्यरला इंग्लंडविरोधातील तिन्ही टेस्ट मॅचमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. त्याला रणजीमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता. परंतु, त्याने कंबरदुखीचे कारण देत रणजीकडे पाठ फिरविली होती.
एनसीएने बीसीसीआयला यावर पत्र पाठविल्याचे वृत्त आहे. यामध्ये श्रेयस हा फिट असल्याचे म्हटले आहे. यानंतर सोशल मीडियावर अय्यरबाबत उलटसुलट बोलले जात आहे. काही क्रिकेटप्रेमींनी त्याला रणजीमध्ये खेळायचे नव्हते, यामुळे दुखापतीचे खोटे कारण सांगितल्याचे म्हटले आहे.
एनसीएचे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी याची पुष्टी केली आहे. श्रेयसला कोणतीही नवीन दुखापत नसून तो तंदुरुस्त आहे असे म्हटले आहे. अय्यरला कोणतीही दुखापत नाही आणि शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सामन्याच्या निवडीसाठी तो उपलब्ध आहे, असे ते म्हणाले. आता बीसीसीआय काय कारवाई करते, की अय्यर उद्यापासून सुरु होणाऱ्या मुंबई-बडोदा सामन्यात खेळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.