Shreyas Iyer in IPL 2022 Mega Auction: दिल्ली कॅपिटल्स संघाला IPL 2020 मध्ये अंतिम फेरीत घेऊन जाणारा कर्णधार श्रेयस अय्यर आता नव्या संघाच्या शोधात आहे. IPL 2021 मध्ये त्याला सुरूवातीच्या स्पर्धेला मुकावे लागले होते. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला आणि त्याच्या जागी ऋषभ पंतला कर्णधारपद देण्यात आले. त्यानंतर IPL 2022च्या मेगा लिलावाच्या आधी दिल्लीने श्रेयस अय्यरला करारमुक्त केले. त्यामुळे आता मेगा लिलावात त्याच्या बोली लावली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, श्रेयस अय्यरची क्षमता लक्षात घेता तीन बडे संघ त्याच्यावर बोली लावण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे.
श्रेयस अय्यर सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. तेथे तो वन डे मालिका खेळणार आहे. ही मालिका त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने बंगळुरूचे कर्णधारपद सोडल्यामुळे RCB चा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत ते श्रेयस अय्यरवर बोली लावू शकतात. अय्यरने दिल्लीला अंतिम फेरीत धडक मारून दिली होती. त्यामुळे कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून अय्यरवर बोली लावण्यास RCB उत्सुक आहे. कोहलीनंतर श्रेयस अय्यरच्या रूपाने RCB ला नवा कर्णधार हवा आहे.
तसेच, काही सुत्रांच्या माहितीनुसार, IPL 2021चे उपविजेते कोलकाता नाईट रायडर्सदेखील नव्या दमाच्या कर्णधाराच्या शोधात आहे. तर पंजाब किंग्स संघाने त्यांचा कर्णधार केएल राहुल यालाच करारमुक्त केले आहे. अशा परिस्थितीत हे दोन संघ देखील श्रेयस अय्यरसाठी बोली लावण्यास उत्सुक असल्याचे बोललं जात आहे. सुरूवातीला श्रेयस अय्यर हा लखनऊ किंवा अहमदाबाद या नव्या संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल असं बोललं जात होतं. त्यानंतर अहमदाबाद संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे गेल्याच्या बातम्या आल्या. तसेच लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल असू शकतो अशाही चर्चा रंगल्या. त्यामुळे श्रेयस अय्यर या नव्या संघांकडे जात नसल्याचे स्पष्ट झाले. आता बंगळुरू, कोलकाता आणि पंजाब यापैकी कोणता संघ श्रेयस अय्यरच्या बाबतीत बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.