Join us  

श्रेयस अय्यर टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार! KKR च्या दिग्गज खेळाडूचा मोठा दावा

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे जेतेपद जिंकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 4:29 PM

Open in App

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे जेतेपद जिंकले. KKR चे हे तिसरे आयपीएल जेतेपद आहे आणि दोन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली जेतेपदं जिंकणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी २०१२ व २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली KKR ने बाजी मारली होती. दहा वर्षानंतर कोलकाताने जेतेपद पटकावल्यानंतर श्रेयसकडे टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा ( Robin Uthappa ) याने टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार म्हणून श्रेयसच्या नावावर दावा सांगितला आहे.

श्रेयसने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत संयम व अचूक निर्णयांची झलक दाखवली. त्याने त्याच्या गोलंदाजांचा चांगला वापर करून घेताना संघाला अडचणीच्या स्थितीतूनही बाहेर काढले. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात त्याचे नेतृत्वकौशल्य अधिक बहरले. आयपीएल २०२४ पूर्वी श्रेयसच्या आयुष्यात बरेच काही घडले. दुखापतीमुळे त्याला मागील आयपीएलमध्ये खेळता आले नव्हते... देशांतर्गत क्रिकेटमध्येही काही सामने मुकावे लागले होते आणि त्यामुळे BCCI ने त्याला वार्षिक करारातूनही वगळले. संकटात माणसाचे खरे कौशल्य समोर येते, तसंच काहीसं श्रेयसच्या बाबतीत पाहायला मिळालं. 

KKR ने त्याच्या नेतृत्वाखाली १५ सामन्यांत ९ विजय मिळवले. त्याचे हे यश पाहून उथप्पाने भारताचा भविष्याचा कर्णधार शुबमन गिलच्या आधी श्रेयसचे नाव पुढे केले आहे. JioCinema वर तो म्हणाला,"मी इथे सांगत आहे. तो भारताचा भावी कर्णधार असणार आहे. मला वाटते की तो पुढच्या पंक्तीत बसला आहे, कदाचित शुबमन गिलच्याही पुढे आहे. त्याच्याकडे संघ हाताळण्याची क्षमता आहे. गौतम गंभीर, चंद्रकांत पंडित आणि अभिषेक नायर या तीन अतिशय मजबूत व्यक्तिमत्त्वांसह काम करत असताना त्याने बरेच काही शिकले आहे."  

गौतम गंभीर, अभिषेक नायर व चंद्रकांत पंडित अशी स्टार मंडळी सोबत असताना दडपण हाताळणे अवघड आहे, परंतु श्रेयसने ते करून दाखवले आणि मैदानावर योग्य निर्णय घेतले. "तुम्हाला संपूर्ण सीझनमध्ये या भक्कम व्यक्तिमत्त्वांमधून तुमचा मार्ग काढावा लागेल आणि शिकावे लागेल.  सर्वोत्तम कामगिरी करताना आणि योग्य कॉल करताना संपूर्ण आयपीएल हंगामात नेव्हिगेट करणे सोपे नाही. त्याने हे केले आहे. तो पुढील भारतीय कर्णधारासाठी योग्य आहे," असे उथप्पा पुढे म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२४श्रेयस अय्यर