मुंबईत जन्मलो, येथेच वाढलो. लहानपणापासून घरात, सोसायटीच्या परिसरात क्रिकेट खेळायचो. भोवताली वातावरणही क्रिकेटचेच. गल्लीतील खेळानंतर पुढे शालेय स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला लागलो. शाळेत, घरी आणि परिसरात बालपणापासूनच माझ्यातील आक्रमक फलंदाज दिसू लागला. शालेय स्पर्धेत माझा फटका मारण्याचा अंदाज वेगळा होता आणि मी मोठमोठे शॉट्स सहज मारत असे. त्यामुळे प्रशिक्षकांचेही माझ्यावर विशेष लक्ष गेले. पुढे वडिलांनी शिवाजी पार्क जिमखान्यात प्रशिक्षणासाठी दाखल केले. येथे खरे मार्गदर्शन आणि अनुभवी प्रशिक्षक मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात, की ती तुम्हाला नक्की मिळते
मी इतर मुलांसारखाच सामान्य खेळाडू होतो, पण आक्रमक फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे वेगळी ओळख तयार होत गेली. शालेयपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेपर्यंत मग रणजी ट्रॉफी असो की, आयपीएल हंगामातील कामगिरी.. खांद्याच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ खेळापासून लांब राहणं असो की पुनरागमन करून उत्कृष्ट खेळीचं प्रदर्शन.. अशा कैक प्रसंगातून मी शिकत आलो आणि ते पुढे जात आहे. ही एक यात्रा आहे; असे काही नाही की जे एका रात्रीत मिळून जाईल. पण तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात, तेव्हा ती नक्की मिळते. सध्या मी ज्या ठिकाणी आहे त्याबद्दल कृतज्ञ आहे. अजूनही पुढे जाण्याची इच्छा आहे. अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. त्यामुळे मी कधी पूर्णपणे समाधानी नसतो. आतून नेहमीच काहीतरी मिळवण्याची भूक असते. अय्यरनं शेअर केला खवय्येगिरीचा किस्सा
लहानपणी मी फार खवय्या होतो. चार-चार वडापाव खायचो. मी शारीरिकदृष्ट्या खूप सशक्त. खूप जाडसरही दिसायचो. सातत्याने सराव करायचो. लहानपणी मी १०० मीटर शर्यतीत भाग घेत असे. पण अंडर-१९ वर्ल्ड कपनंतर मी वडापाव खाणे बंद केले. तेव्हापर्यंत मी काहीही खात असे. नंतर लक्षात आले की, एका प्रोफेशनल खेळाडूसाठी आहार किती महत्त्वाचा आहे. कोचिंगसाठी माझ्या वडिलांनी खूप परिश्रम घेतले. तर आईने मला कायम फिट राहण्यासाठी मदत केली. माझ्या प्रत्येक कामगिरीवर ते आजपर्यंत बारीक लक्ष ठेवत आले.
मी यशाच्या मागे धावत नाही, पण...
प्रत्येकाच्या करिअरमध्ये चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. कोणाचेच करिअर स्थिर नसते. कोणतीही गोष्ट आज आहे उद्या नाही. त्यामुळे तुम्ही जेवढे वर जाऊ शकता, तेवढेच खालीही कोसळू शकता. त्यामुळे जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करा.मी यशाच्या मागे धावत नाही, पण अशा एका ठराविक शिस्तबद्ध दिनचर्येचे पालन करतो. जी मला यशाकडे घेऊन जाणारी वाट वाटते. तुमचा प्रवास अन् तुमची विचारसरणीच तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवत असते. माझ्या विचारानुसार, मी स्वतःच एक चॅम्पियन आहे.
तुमच्याशिवाय तुम्हाला दुसरा कोणीच साथ देणार नाही
तुम्ही स्वतःच स्वतःला एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर नेत असता. त्यामुळे तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला मोठी साथ देणारा दुसरा कोणी नाही.सध्या हातात ज्या संधी आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करा. सुरुवातीला अपयश आले तरी हार मानू नका. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा, असेही त्याने म्हटले आहे.