मुंबई : श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये परतत आहे. आगामी आयपीएल हंगामात त्याच्या नेतृत्वात केकेआरचा संघ मैदानात असेल. तर, मावळता कर्णधार नितीश राणावर उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केकेआरच्या फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.
कोलकाताच्या फ्रँचायझीचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी गुरूवारी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, दुखापतीमुळे श्रेयस आयपीएल २०२३ ला मुकला हे खरोखरच दुर्दैवी होते. पण आता कर्णधार म्हणून तो परतत असल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने ज्या प्रकारे मेहनत घेतली आहे आणि त्याने दाखवलेला फॉर्म त्याची प्रतिभा दर्शवतो. मागील हंगामात नितीशने श्रेयसची जबाबदारी सांभाळली आणि त्याने उत्तम काम केले. उपकर्णधार म्हणून नितीश केकेआर संघाच्या फायद्यासाठी श्रेयसला सर्वतोपरी साथ देईल यात शंका नाही.
अय्यरचे पुनरागमन
"मला माहित आहे मागील हंगामात आमच्यासमोर अनेक आव्हाने होती, त्यात माझी दुखापतही होती. नितीश राणाने माझ्या अनुपस्थितीत चांगले काम केले. केकेआरने त्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले याचा मला आनंद आहे", असे श्रेयस अय्यरने सांगितले.