Join us  

“निर्धाव चेंडू खेळणे हा गुन्हाच, धाव न काढल्यास दडपण येते”: श्रेयस अय्यर 

श्रेयसने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 9:31 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘टी-२० प्रकारात फलंदाज या नात्याने निर्धाव चेंडू खेळणे हा मोठा गुन्हा आहे. निर्धाव चेंडू फलंदाजांवर दडपण आणतो. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर नजर टाकल्यास ते पहिल्या चेंडूपासून धाव घेण्यास तुटून पडतात. टी-२० सामने जिंकण्याचा मूलमंत्र धावा काढणे हाच आहे.’

श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत मालिकावीराचा सन्मान मिळवणारा श्रेयस अय्यर याने हे मत व्यक्त केले आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना श्रेयसने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाचीदेखील प्रशंसा केली. तीनही सामन्यांत अर्धशतकी खेळीसह २०४ धावा काढणारा श्रेयस आयपीएलमध्ये यंदा केकेआरचे नेतृत्वदेखील करणार आहे.

भारतीय संघ ताकदवान खेळाडूंचा समूह असल्याचे श्रेयसने सांगितले. त्याच्यानुसार, ‘जे खेळाडू राखीव बाकावर बसलेले असतात, ते अंतिम एकादशमध्ये खेळणाऱ्यांइतकेच प्रतिभावान असतात. त्यांच्यात कुठल्याही स्थितीत चांगली कामगिरी करण्याची क्षमता असते. टी-२०मध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याचाच विचार करावा लागतो.’

रोहितच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक करताना श्रेयस म्हणाला, ‘कर्णधार म्हणून रोहित शानदार आहे. तो एक खेळाडू या नात्याने विचार करतो. त्याच्यामुळेच आमचा संघ लवकर ट्रॅकवर परतला. तो प्रत्येक खेळाडूला समजून घेतो. कोच आणि सपोर्ट स्टाफकडून त्याला काय हवे, याची रोहितला जाणीव आहे. त्याच्या नेतृत्वात संघातील माहोलदेखील उत्साही आहे.’

आयपीएलमध्ये केकेआर संघाचे नेतृत्व करताना मला खेळाडूंचा कर्णधार बनायची इच्छा आहे. २०१८ ते २०२० या कालावधीत मी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले. यावेळी वेगळ्या मानसिकतेसह जबाबदारी सांभाळणार आहे. आता अधिक परिपक्व झालो आहे. संघाचे एकच लक्ष्य असावे, ते म्हणजे सामना जिंकणे. याच भावनेने मी नेतृत्व करणार असल्याचे श्रेयसने सांगितले.

जखमेतून सावरून यशस्वी पुनरागमन

श्रेयसने सांगितले की, ‘जखमी झाल्यापासून प्रवीण आमरे यांचे चांगले मार्गदर्शन लाभले. त्यांच्यामुळेच मी जखमेतून लवकर सावरून यशस्वी पुनरागमन केले. स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग कोच रजनीकांत यांनी फार सहकार्य केले. खेळाडूला कशा प्रकारचा शारीरिक सराव हवा, याची जाण असलेले रजनीकांत हे उत्कृष्ट ट्रेनर आहेत. एनसीएत राहून तीनही प्रकारांत खेळण्यास लवकर सज्ज होऊ शकलो.’

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघश्रेयस अय्यर
Open in App