Shreyas Iyer century in Ranji Trophy: भारतीय क्रिकेट संघात कमबॅक करण्यासाठी धडपडत असलेल्या श्रेयस अय्यरनं रणजी स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावले आहे. या खेळीच्या जोरावर त्याने टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावले आहेत. पण त्याआधी या खेळीचा फायदा त्याला IPL मेगा लिलावात होऊ शकतो. रणजी करंडक स्पर्धेतील २०२४-२५ च्या हंगामातील चौथ्या फेरीतील लढतीत श्रेयस अय्यरनं शतक झळकावले आहे.
एक सामना मुकला; पण कमबॅकमध्ये शतक मारायला नाही चुकला
श्रेयस अय्यर रणजी करंडक स्पर्धेत गत चॅम्पियन मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बॅक टू बॅक शतकासह त्याने आपल्यातील क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. याआधीच्या देशांतर्गत स्पर्धेत त्याला अपेक्षित धमाका करता आला नव्हता. पण आता तो चांगलाच फार्मात दिसतोय. याआधीच्या सामन्याला तो मुकला होता. त्यानंतर त्याने अगदी दाबात एन्ट्री केली आहे. एलीट राउंडमधील ग्रुप-एमधील ओडिसा विरुद्धच्या लढतीत त्याने पहिल्याच दिवशी शतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे १५ वे शतक आहे.
श्रेयस अय्यरच्या भात्यातून रणजी स्पर्धेत आली सलग दुसरी सेंच्युरी मुंबईच्या शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात श्रेयय अय्यरनं ओडिसाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या पदरी गोल्डन डक आल्यावर संघाचा डाव सावरताना अय्यरनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सलग दुसरे शतक झळकावले. याआधी १८ ऑक्टोबरला महाराष्ट्र विरुद्धच्या लढथीत त्याच्या भात्यातून शतक आल्याचे पाहायला मिळाले होते.
गतं हंगामात ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला होता 'नारळ'; आता लिलालावत पैशांची बरसात होणार?
आयपीएलच्या गत हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ चॅम्पियनही ठरला. पण आयपीएल मेगा लिलालाआधी कोलकाता संघाने या चॅम्पियन कॅप्टनला रिटेन करण्याऐवजी रिलीज केल्याचे पाहायला मिळाले. आता तो २ कोटींच्या बेस प्राइजसह लिलावात उतरणार आहे. रणजीतील धमाकेदार शोनंतर त्याची ही किंमत आणखी वाढेल. आयपीएलच्या मेगा लिलावात त्याच्यावर पैशांचा पाऊस पडला तर ते नवल वाटू नये.