IND vs SL : 'शॉर्ट' बॉलला आव्हान देण्यासाठी श्रेयसचा कसून सराव; एकसारखे बाद होण्याची चूक सुधारणार?

आखूड टप्प्याच्या चेंडूवर श्रेयस अय्यर वारंवार बाद होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:54 PM2023-11-01T12:54:58+5:302023-11-01T12:55:30+5:30

whatsapp join usJoin us
Shreyas Iyer tackles short ball weakness in key practice session in Mumbai ahead of ind vs sl match in icc odi world cup 2023  | IND vs SL : 'शॉर्ट' बॉलला आव्हान देण्यासाठी श्रेयसचा कसून सराव; एकसारखे बाद होण्याची चूक सुधारणार?

IND vs SL : 'शॉर्ट' बॉलला आव्हान देण्यासाठी श्रेयसचा कसून सराव; एकसारखे बाद होण्याची चूक सुधारणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आखूड टप्प्याच्या चेंडूवर श्रेयस अय्यर वारंवार बाद होतो. चौथ्या स्थानावर खेळणाऱ्या श्रेयसला ही चूक सुधारावीच लागेल. त्यासाठी मंगळवारी त्याने श्रीलंकेविरुद्ध वानखेडेवर रंगणाऱ्या वन डे विश्वचषकातील सातव्या सामन्याआधी कसून सराव केला. हे सत्र ऐच्छिक असल्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल या दिग्गजांनी सरावाकडे पाठ फिरविली होती.

सराव सत्राच्यावेळी सर्व फोकस श्रेयसच्या फटक्यांवर होता. गोलंदाजांनी देखील विश्रांती घेण्यास प्राधान्य दिले. भारत सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून उपांत्य फेरी निश्चित झाली आहे. तरीही उणिवा दूर करण्यावर सतत भर देणे संघाच्या हिताचे ठरणार आहे. पसंतीच्या चौथ्या स्थानावर फलंदाजी करीत असताना तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. यामागील कारण आखूड टप्प्याच्या चेंडूवर तो अलगद जाळ्यात अडकला जातो. यामुळे मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले आहे. आजच्या सरावात ही उणीव दूर करण्यावर श्रेयसचा भर होता. त्यादृष्टीनेच त्याची फटकेबाजी जाणवली. घरच्या मैदानावर ऐन उन्हात दोन तास थ्रोडाउन तज्ज्ञ डी. राघवेंद्रच्या मार्गदर्शनात आखूड टप्प्याचे चेंडू खेळून काढले. त्याआधी स्थानिक नेट गोलंदाजांनी त्याला मारा केला. श्रीलंकेचा नुआर सनेवीरत्ने आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड त्याच्या सरावावर लक्ष ठेवून होते.

श्रेयस अय्यरचा कसून सराव
लंकेविरुद्ध लढतीसाठी वापरात येणाऱ्या खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना बराच वेळ ‘पूल’ आणि ‘हूक’चे फटके मारताना अय्यरने चेस्ट गार्डचादेखील वापर केला. अनेक चेंडू त्याने सीमारेषेबाहेर टोलविले. अखेरच्या टप्प्यात मुख्य कोच राहुल द्रविड यांनी श्रेयसला थ्रो डाउन केले.  शिवाय काही चेंडूही टाकले.  गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे श्रेयसचा खेळ दूरवरून न्याहाळत होते.  क्षेत्ररक्षण कोच टी. दिलीप हेदेखील थ्रोडाउन गोलंदाजांमध्ये सहभागी झाले होते. अय्यर धर्मशाला येथे आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद झाला. लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पुन्हा एकसारखाच बाद होऊन परतला होता. अष्टपैलू शार्दूल ठाकूर यानेही बराच वेळ फलंदाजीत घाम गाळला. ईशान किशन, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनीदेखील नियमित सराव केला. अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी देखील गोलंदाजीच्या तुलनेत बराच वेळ फलंदाजी करण्यावर भर दिला.

Web Title: Shreyas Iyer tackles short ball weakness in key practice session in Mumbai ahead of ind vs sl match in icc odi world cup 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.