नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला. जवळपास 5-6 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या जडेजाने पहिला सामना अविस्मरणीय केला. दरम्यान, या मालिकेच्या तोंडावर दुखापतीमुळे बाहेर झालेला श्रेयस अय्यर पुन्हा एकदा भारतीय संघात सामील होणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली असून अय्यर दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा असणार का हे पाहण्याजोगे असेल.
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यरने पाठीच्या दुखापतीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे आता अय्यर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने यासाठी मंजुरी दिली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी दुसऱ्या कसोटीपूर्वी श्रेयस अय्यर नवी दिल्लीत संघात सामील होईल.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, श्रेयस अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
- 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
- 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
- 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, इंदूर
- 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका
- 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई
- 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
- 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"