मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, BCCI सचिव जय शाह यांच्याकडून खेळाडूंना वारंवार देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला गेला. पण, इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता बीसीसीआय या दोन खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळणार असल्याची चर्चा आहे आणि पुढे असे प्रकार घडू नये, यासाठी BCCI कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याचा व विशेष बोनस देण्याचा विचार करत आहे. हे वृत्त असताना श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) मोठा निर्णय घेतला आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा सदस्य असलेल्या श्रेयसला काही खास कामगिरी करता आली नाही आणि त्याला दुखापतीचं कारण देऊन संघातून वगळले गेले. त्यानंतर तो रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणे अपेक्षित होतं, परंतु त्याने अद्याप पुर्णपणे तंदुरुस्त न झाल्याचे सांगून ती मॅच खेळला नाही. पण, त्यानंतर NCA अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला कोणतीच नवीन दुखापत नाही आणि तो तंदुरुस्त असल्याचा अहवाल सांगितला. त्यामुळे श्रेयसचा खोटारडेपणा उघड झाल्याची चर्चा रंगली. त्यानंतर बीसीसीआयच्या आक्रमक पवित्र्याच्या बातम्या समोर आल्या.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत श्रेयसला ३५,१३, २७ व २९ अशा धावा करता आल्या होत्या. त्यानंतर त्याची गच्छंती निश्चित होती. त्याच्याजागी रजत पटीदारला संधी दिली गेली आणि तोही अपयशी ठरला. श्रेयसने १४ कसोटी सामन्यांत १ शतक व ५ अर्धशतकासह ३६.८६ च्या सरासरीने ८११ धावा केल्या आहेत. आता श्रेयस अय्यर रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. २ मार्चपासून तामिळनाडू संघाविरुद्धचा हा सामना सुरू होणार आहे आणि त्यात खेळणार असल्याचे श्रेयसने मुंबई क्रिकेट असोसिएशनला ( MCA ) कळवले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. India vs England पाचवी कसोटी ७ मार्च पासून धर्मशाला येथे खेळवली जाणार आहे.