मुंबई : आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी राष्ट्रीय निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली असून मुंबईकर अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी १६ सदस्यांच्या भारतीय कसोटी संघाची घोषणा केली. त्याचवेळी, न्यूझीलडंविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही टीम इंडिया घोषित करण्यात आली असून यामध्ये मुंबईकर श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा मोहम्मद सिराज यांची संघात वर्णी लागली आहे.
सोमवारी मुंबईतील बीसीसीआय कार्यालयामध्ये टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी मालिकेसाठी रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा या स्टार फिरकी गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे पुनरागमन केले आहे. मात्र, त्याचवेळी टी-२० मालिकेसाठी मात्र दोघांनाही संघात स्थान
मिळालेले नाही. याआधीही आॅस्टेÑलिया व न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून दोघांना वगळण्यात आले होते. त्याचवेळी, श्रेयस अय्यर व मोहम्मद सिराज या दोन युवा खेळाडूंना टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून चमक दाखवलेला सिराज प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने दक्षिण आफ्रिका दौºयातही भारत ‘अ’ संघाकडून चांगली कामगिरी केली होती. दुसरीकडे, गेल्या एक वर्षापासून श्रेयस अय्यर मुंबईसाठी आणि भारत ‘अ’ संघाकडून सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. त्याने आॅस्टेÑलियाविरुद्धच्या सराव सामन्यात द्विशतकही झळकावले होते. तसेच, त्याने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या तिरंगी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकी तडाखाही दिला होता. त्याचवेळी, एक नोव्हेंबरला होणाºया पहिल्या टी-२० सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याचे जाहीर केलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरालाही टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात दिल्लीत होणाºया सामन्यासाठी निवडण्यात आले आहे.
१ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका होणार असून यानंतर श्रीलंका संघ भारत दौºयावर येणार आहे. १६ नोव्हेंबरपासून भारत - श्रीलंकादरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. यानंतर १० ते १७ डिसेंबरदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात आल्यानंतर २० ते २४ डिसेंबर दरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका पार पडेल. या मालिकेनंतर जानेवारी महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौºयावर जाईल.
>कोहलीची विश्रांती लांबवली...
संघनिवडीआधी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती मिळणार असल्याची मोठी चर्चा रंगली. मात्र, कोहलीने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका आणि लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता व नागपूर येथे खेळविण्यात येतील. त्याचवेळी, कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यासह मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये कोहलीला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, यानंतर होणाºया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खडतर दौºयासाठी कोहली तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. कसोटी संघामध्ये आश्विन व जडेजा यांच्यासह तिसरा विशेष फिरकीपटू म्हणून चायनामन कुलदीप यादवचीही वर्णी लागली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या त्रिकुटाने संघात पुनरागमन केले असून चेतेश्वर पुजारा आणि यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा यांनाही कसोटी संघात स्थान मिळाले आहे.कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. पण हे योग्य नाही. कसोटी मालिकेबाबत बोलायचे झाल्यास तो खेळेल आणि वेळ आल्यास कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब होईल. आम्ही कोहलीच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असून तो आयपीएलपासून सातत्याने खेळत आहे. त्याला नक्कीच विश्रांती देणे गरजेचे आहे आणि यावर कसोटी मालिकेनंतर विचार करण्यात येईल.
- एमएसके प्रसाद, निवड समिती अध्यक्ष
>निवडण्यात आलेला भारतीय संघ :
टी-२० : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांड्ये, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आशिष नेहरा (केवळ एका सामन्यासाठी).
कसोटी (दोन सामन्यांसाठी) : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार व इशांत शर्मा.
Web Title: Shreyas, Mohammed are in the Twenty20 squad, Rahane is the vice-captain of the Test team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.